मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला जिल्हाप्रमुख असलेल्या आनंद दिघेंचा फोटो लावून तुम्ही काय साध्य करताय? अशा पद्धतीने ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्याचा हा राष्ट्रीय कट आहे असा थेट आरोप ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी केला. आपण हे आनंद दिघे यांचा आदर ठेऊन बोलत आहोत असंही राऊत म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांचे नेते हे नरेंद्र मोदी आहेत, बाळासाहेब ठाकरे नाहीत असा टोला राऊत यानी लगावला.
काय म्हणाले संजय राऊत?
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "शिंदे गट ज्या जाहिराती करतो त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखाएवढाही नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूला तुम्ही शिवसेना जिल्हाप्रमुखाचा फोटो लावता? तुम्हाला बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड कमी करायचा आहे का? बाळासाहेबांच्या बाजूला आणखी एक फोटो लावणे हा एक राष्ट्रीय कट आहे. बाळासाहेबांचे महत्व कमी करण्यासाठी तुम्ही या गोष्टी करताय हे जनता लक्षात ठेवते. आनंद दिघेंचा पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतोय."
शिंदेसेनेचा राऊतांवर पलटवार
संजय राऊतांनी आनंद दिघेंवर केलेल्या वक्तव्यानंतर ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. टेंभीनाका आनंद आश्रम इथे आंदोलन करत आंदोलकांनी संजय राऊतांचा पुतळा जाळला.
संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, संजय राऊत हे बिनकामाचे आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर हे टीका करतात. आनंद दिघे यांच्या लोकप्रियतेवर हे जळतात म्हणून अशा पद्धतीने आरोप करतात.
बाळासाहेबांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. पण आनंद दिघेंनी ठाणे, पालघरमध्ये मोठं काम केलं आहे. एकनाथ शिंदेंनी त्यांना गुरुस्थानी मानलं. मग आनंद दिघेंचा फोटो लावणे हा बाळासाहेबांचा अपमान कसा? असा प्रश्न राज्यमंत्री योगेश कदम यांनी केला.
मोदींचा संदेश आपल्यासाठी मार्गदर्शक, शिंदेंचा लेख
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका वृत्तपत्रात पंतप्रधान मोदींचं अभिष्टचिंतन करणारा लेख लिहिला आहे. जनतेचा नेता, जगाचा आदर्श असं त्यांनी पंतप्रधान मोदींविषयी म्हटलं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि नरेंद्र मोदींचं कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी असतं असं शिंदेंनी आपल्या लेखात म्हटलंय, मोदींनी दिलेला संदेश आपल्यासाठी कायम मार्गदर्शक असतो असं शिंदेंनी म्हटलं.
ही बातमी वाचा :