Mhada Housing Updates : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे (Mhada Mumbai Lottery) 4082 सदनिकांच्या विक्रीकरिता 14 ऑगस्ट 2023 रोजी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीतील कर्ज प्रक्रियेत विलंब झालेल्या यशस्वी अर्जदारांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सदनिकेकरिता पहिल्या टप्प्यातील रक्कमेचा भरणा केलेल्या 235 लाभार्थ्यांना उर्वरित रक्कम भरण्यासाठी 15 दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ देण्याच निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी जाहीर केला आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल हे दर सोमवारी आणि गुरुवारी नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी वेळ राखीव ठेवत आहेत. या दरम्यान सोडतीतील यशस्वी अर्जदारांनी वित्तीय संस्थांकडून गृहकर्ज आणि इतर कारणांनी विलंब होत असल्यामुळे काही दिवसांची सवलत देण्याबाबत निवदेन दिले होते. अनेक लाभार्थ्यांकडून आलेल्या निवेदनावर विचार करून सदनिकेची उर्वरित रक्कम भरण्याकरिता 15 दिवसांची मुदत वाढ देण्याचा निर्णय जयसवाल यांनी नुकताच दिला आहे.
या अर्जदारांची सदनिका ताब्यात देण्याची प्रक्रिया प्रलंबित
मुंबई मंडळातर्फे सोडतीत यशस्वी झालेल्या सर्व पात्र अर्जदारांना प्रथम सूचना पत्र पाठविण्यात आले आहे. पैकी सुमारे 1600 लाभर्थ्यांनी सदनिकेच्या विक्री किमतीचा 100 टक्के भरणा म्हाडाकडे केला आहे. यामधील प्राप्त सदनिकेची 100 टक्के विक्री किंमत, मुद्रांक शुल्क भरणा करून दस्तऐवज नोंदणी केले आहेत. त्याशिवाय, म्हाडाने विहित केलेला आगाऊ देखभाल खर्च भरला आहे, अशा 750 अर्जदारांना मंडळातर्फे ताबा पत्र देण्यात आले आहे. तसेच 235 अर्जदारांनी प्रथम टप्प्यातील रकमेचा भरणा केला असून मंडळाकडून वित्त संस्थांकरिता कर्ज मिळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. मात्र, त्यांना गृह कर्ज मिळण्यासाठी वित्त संस्थांकडून विलंब होत आहे. तसेच , काही अर्जदारांनी सदनिकेची रक्कम जरी पूर्ण भरलेली असली तरी त्यांनी सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, कलाकार असल्याचे प्रमाणपत्र सादर करणार या अटी व शर्तीच्या अधीन राहून अर्ज केले होते व ते ही कागदपत्र सादर करू शकलेले नाहीत, अशा अर्जदारांना सदनिकेचा ताबा देण्याची प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या 4082 सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त एक लाख 20 हजार 244 पात्र अर्जांची संगणकीय सोडत 14 ऑगस्ट 2023 रोजी नवीन संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) द्वारे काढण्यात आली. या नवीन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व पात्रता निश्चितीनंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभागी झाले.