Rahul Gandhi On RSS :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (RSS) वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भिवंडी कोर्टानं नुकत्याच दिलेल्या आदेशाला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (High Court Of Bombay) आव्हान दिलं आहे. यावर सुनावणी करत तक्रारदाराला तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं मंगळवारी दिले आहेत. भिवंडी कोर्टात (Bhiwandi Court) यावर 20 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार असल्यानं त्याआधी या याचिकेवर सुनावणी घेण्याची विनंती राहुल गांधींच्यावतीनं हायकोर्टाकडे करण्यात आली. ही विनंती मान्य करत न्यायमूर्ती आर.एन.लड्ढा यांनी कुंटे यांना उत्तर दाखल करण्यासाठी 5 जानेवारीपर्यंत मुदत दिली. त्यानंतर गांधी यांना प्रत्युत्तर दाखल करण्याचे आदेश देत हायकोर्टातील सुनावणी 10 जानेवारी रोजी घेण्याचं निश्चित केलं आहे.  


काय आहे याचिका :


वर्ष 2014 मधील निवडणूक प्रचारा दरम्यान केलेल्या एका भाषणात राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसनं केल्याचं म्हटलं होतं. त्याविरोधात आरएसएस कार्यकर्ता राजेश कुंटे यांनी भिवंडी दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी हायकोर्टानं नाकारलेली कागदपत्रे कुंटे यांनी 3 जून रोजी पुन्हा एकदा कोर्टात सादर करण्याची परवानगी भिवंडी न्यायालयात मागितली आहे. मात्र, हायकोर्टानं सप्टेंबर 2021 मध्ये ही मागणी फेटाळून लावलेली असतानाही भिवंडी कोर्टानं कुंटे यांनी सादर केलेली (ट्रान्सक्रिप्ट) कागदपत्रं नोंदवून घेतल्याचा दावा राहुल गांधी यांनी या याचिकेतून केला आहे.


काय आहे प्रकरण :


राहुल गांधी यांनी मार्च 2014 मध्ये भिंवडीमधील एका जाहीर सभेत महात्मा गांधींच्या हत्येबाबत विधान करताना, "ही हत्या आरएसएसवाल्यांनी केली आहे" असा उल्लेख केल्याचा आरोप कुंटे यांनी केला आहे. या भाषणाच्या विरोधात कुंटे यांनी स्थानिक दंडाधिकारी न्यायालयात राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटलाही दाखल केला आहे. राहुल गांधी यांच्या या भाषणामुळे संघाची प्रतिमा मलीन झाली. या भाषणाच्या प्रतींना पुरावा म्हणून ग्राह्य धरावे, अशी मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली होती. ही मागणी भिंवडी न्यायालयानं साल 2018 मध्ये नामंजूर केली होती. याविरोधात कुंटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात साल 2019 मध्ये हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल देताना कुंटे यांची मागणी अमान्य करत त्यांची याचिका फेटाळून लावली होती. 


ही याचिका दाखलच होऊ शकत नाही आणि यामध्ये केलेली मागणीही बेकायदेशीर आहे, असा दावा राहुल गांधी यांच्यावतीनं करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी त्यांच्यावरील आरोपांचं खंडन भिंवडी न्यायालयातही केलेलं आहे. आपलं भाषण जोडतोड करुन आणि चुकीच्या पद्धतीनं वापरलं गेल्याचा दावा त्यांनी आपल्या बचावात न्यायालयात केला आहे.