मुंबई : म्हाडाच्या ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्जदारांना अधिक सुलभतेने अर्ज सादर करता यावा, याकरिता म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता लाईव्ह वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी 9 ऑगस्ट 2024 पासून म्हाडाचे संकेतस्थळ https://housing.mhada.gov.in व मोबाइल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. म्हाडा सदनिका विक्रीची संगणकीय सोडत ही पूर्णतः ऑनलाईन असल्याने सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरिता अर्जदारांना मार्गदर्शन करण्यासाठी मंडळातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


म्हाडा मंडळातर्फे आयोजित या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी म्हाडाच्या सोडतीकरिता यापूर्वी व सध्या चालू असलेल्या सोडतीसाठी ज्या अर्जदारांनी नोंदणी केली आहे, तसेच नोंदणी करण्यास इच्छुक आहेत त्यांनी https://youtube.com/live/asSycqY6Dvc?feature=share या लिंकवर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच म्हाडाच्या सोडतीसाठी नोंदणी केलेल्या अर्जदारांना एसएमएसद्वारे व म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावरही Live Webinar ची Link उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. म्हाडाचे अधिकृत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज @mhadaofficial  वरही या वेबिनारचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. 


या वेबिनारमध्ये मुंबई मंडळाचे उपमुख्य अधिकारी (पणन) राजेंद्र गायकवाड, म्हाडाच्या मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके, माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी संदीप बोदेले इच्छुक अर्जदारांच्या शंकांचे निरसन करून माहिती देणार आहेत.  इच्छुक अर्जदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करताना संजीव जयस्वाल यांनी माहिती दिली, म्हाडा एक लोकाभिमुख कार्यालय आहे. त्यामुळे म्हाडा कार्यालयास भेट देणार्‍या नागरिकांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी संवेदनशील असणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हाडातर्फे आयोजित करण्यात येणार्‍या लोकशाही दिन कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक लोकांच्या तक्रारींचे स्वरूप लक्षात आले आहे. त्यादृष्टीने काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.


अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा, म्हाडाचं आवाहन


म्हाडातर्फे नुकतीच मुंबईतील विविध गृहप्रकल्पातील 2030 सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून सोडतीसाठी अर्ज नोंदणी करून सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात आलं आहे.


हेही वाचा


महिला बँकेत भांडतात, लाडकी बहीण योजनेनं कर्मचारी संतापले, काम वाढले; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र