MHADA Lottery 2023 Mumbai : म्हाडाच्या (MHADA) घरासाठी अर्ज करण्यासाठी उशीर झालाय? कागदपत्रांची जुळवाजुळव अजून पूर्ण झालेली नाही? अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली म्हणून गोंधळून जाऊ नका. कारण म्हाडाकडून (Mumbai Mhada) अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता म्हाडाच्या मुंबई मंडळातील 4 हजार 82 घरांच्या सोडतीसाठीच्या अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला 10 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे 18 जुलैला होणारी सोडत आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळातील 4 हजार 82 घरांच्या सोडतीसाठीच्या अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला 10 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्षांकडे पाठविण्यात आला असून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ देण्यात येणार असल्यानं आता सोडतही लांबणीवर जाणार आहे. नियोजित 18 जुलैला होणारी सोडत आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितलं की, चार वर्षांनंतर 4 हजार 82 घरांची सोडत जाहीर झाली असून यासाठी 22 मेपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. यंदा पाहिल्यांदाच नव्या संगणकीय प्रणालीसह आणि नव्या बदलासह सोडत काढण्यात येत आहे. नव्या प्रक्रियेनुसार आवश्यक कागदपत्रे अर्ज करतानाच सादर करणे बंधनकारक आहे. अशा वेळी कागदपत्रं वेळेत उपलब्ध होत नसल्यानं अनेक इच्छुकांना अर्ज करणं शक्य होत नाही. त्यामुळेच सोडतीला प्रतिसादही कमी मिळाला. या पार्श्वभूमीवर मंडळानं सोडतपूर्व प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला उपाध्यक्षांची मंजुरी मिळेल, अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. प्रस्ताव मंजूर झाल्याबरोबर मुदतवाढीची अधिकृत घोषणा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.
मुंबई मंडळाच्या प्रस्तावानुसार, अर्जविक्री-स्वीकृतीला 10 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळ 26 जूनपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज भरण्याची मुदत 8 जुलैपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आरटीजीएस-एनईएफटीसह अनामत रकमेसह अर्ज भरण्याची मुदत 28 जूनऐवजी 10 जुलै अशी होण्याची शक्यता आहे. या मुदतवाढीमुळे 18 जुलैला होणारी सोडत पुढे जाणार आहे.
दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी सोमवारी, 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून होती. पण आता ही तारीख वाढवून 10 जुलैपर्यंत करण्यात आली आहे. म्हाडाची ही घरं गोरेगाव पहाडी, विक्रोळीच्या कन्नमवारनगर, अँटॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर, सायन परळ, ताडदेवमध्ये आहेत. 22 मेपासून नोंदणी, अर्ज विक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.