Threat Call to Mumbai Police: मुंबई पोलिसांना (Mumbai Police) येणाऱ्या धमक्यांचे फोन काही थांबण्याचं काही नाव घेत नाही. आज पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमचा फोन खणाणला आणि पुन्हा एक धमकीचा मेसेज (Threatening Call) मिळाला. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai News) आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे (Pune News) बॉम्बनं उडवण्याची धमकी या फोनवरून देण्यात आली. तसेच, अंधेरी, कुर्ला भागात उद्या (24 जून 2023) संध्याकाळी साडेसहा वाजता स्फोट करण्याची धमकी या फोन कॉलवरुन देण्यात आली आहे.


दरम्यान, मुंबई पोलिसांनी यूपी पोलिसांच्या मदतीनं धमकीचा फोन करणाऱ्याला अटक केली आहे. सुमारे 25 ते 30 वर्षांच्या आरोपीला मुंबईत आणण्यात आलं आहे. कॉल करण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. आरोपीची वेगवेगळी नावं असून तो पोलिसांना त्याचं खरं नाव सांगत नाहीये. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 


मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याच्या धमकीच्या फोनमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कॉलरनं काल सकाळी 10 वाजता पोलीस कंट्रोल रुमला कॉल केला आणि 24 जून रोजी संध्याकाळी 6 : 30 वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला भागात बॉम्बस्फोट होणार असल्याचं सांगितलं.


एवढंच नाहीतर कॉलरनं पुढे बोलताना पोलिसांना सांगितलं की, आपल्याला दोन लाख रुपयांची गरज आहे आणि ही रक्कम मिळाल्यानंतर तो बॉम्बस्फोट थांबवू शकतो. तसेच, पुण्यातही बॉम्बस्फोट होणार आहेत आणि तो स्वत: हा स्फोट घडवून आणतोय, त्यासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले आहेत. दोन लाख रुपये मिळाल्यास तो आपल्या माणसांसोबत मलेशियाला रवाना होईल, असा दावा कॉलरनं केला आहे.


पोलीस तपासादरम्यान कॉलरनं हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून केल्याचं तपासात समोर आलं आहे. आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. अंबोली पोलिसांनी या संदर्भात आयपीसीच्या कलम 505 (1) (बी), 505 (2) आणि 185 अन्वये गुन्हा दाखल केला असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. 


मुंबईहून दिल्लीला जाणारी फ्लाईट हायजॅक? प्रवाशाच्या फोनवरील संभाषणानं गोंधळ 


मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विस्तारा फ्लाईटमध्ये बसलेल्या प्रवाशानं फ्लाइट हायजॅक केल्याचं बोलून तपास यंत्रणांना धक्का दिला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विस्तारा फ्लाईटमध्ये केबिन क्रू प्रवाशांना सीट बेल्ट लावायला सांगत होते आणि लोकांना मदत करत होते, तेव्हा फ्लाईटमध्ये बसलेला एक प्रवासी फोनवर जोरजोरात बोलत होता. "अहमदाबाद की फ्लाइट बोर्ड करना है, कोई भी दीक्त हो तो मे कॉल करना, हायजॅक का पुरा प्लानिंग है उसका सारे धुरी है चिंता मत करो.", असं प्रवाशी फोनवर जोरजोरात बोलत होता. त्यानंतर फ्लाईटमध्ये गोंधळ उडाला. 


अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे वय 23 वर्ष असून तो हरियाणाचा रहिवाशी असल्याचं सांगण्यात येत आहे. तो मानसिक आजारी होता आणि त्यामुळेच फ्लाईटमध्ये असं संभाषण झाल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 336 आणि 505 (2) अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.