मुंबई : म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठीची लॉटरी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण गिरणी कामगारांसाठी असलेल्या घरांच्या लॉटरीनंतर मुंबई मंडळाच्या लॉटरीची जाहिरात येणार आहे, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे यांनी दिली.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील घरांसाठी म्हाडाच्या लॉटरीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. तर मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हाडाच्या घरांची लॉटरी जाहीर होणार आहे.
मुंबईत सर्वसामान्यांसाठी सुमारे हजार घरं असतील, अशी शक्यता आहे. मात्र अद्याप संख्या निश्चित झाली नाही. गोरेगावमध्ये यंदा सर्वात जास्त घरं असून, गोरेगावमधील सिद्धार्थ नगर 1 आणि 2 मधील घरांसाठी लॉटरी निघणार आहे. त्याचसोबत, मुलुंडमध्येही या लॉटरीत म्हाडाची घरं असणार आहेत.
गिरणी कामगारांसाठी लॉटरी येत्या महिन्यात
म्हाडाची गिरणी कामगारांसाठी असणारी घरांची लॉटरी येत्या एका महिन्यात निघणार आहे. 22 एप्रिलला म्हाडाच्या गिरणी कामगारांसाठी असलेल्या घरांची जाहिरात येणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या उपाध्यक्षांनी दिली. मुंबईत 2 हजार 678 घरांची लॉटरी गिरणीकामगारांसाठी काढली जाणार आहे.