मुंबई: टाटा रुग्णालयात कॅन्सरवर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची सोय व्हावी म्हणून म्हाडाने बॉम्बे डाइंगमधील 100 घरं ही टाटा रुग्णालयाला हस्तांतरित केली आहेत, टाटा रुग्णालयाने या पुढील कार्यवाही करायची आहे. यामध्ये म्हाडाकडून कुठल्याही प्रकारची दिरंगाई झालेली नाही असं म्हाडाने स्पष्ट केलं आहे. टाटा रुग्णालयातील कँसरग्रस्त रुग्ण फुटपाथवर राहतात ही बातमी एबीपी माझाने दाखवली होती. या बातमीवर आता म्हाडाचे स्पष्टीकरण आलं आहे.
म्हाडाने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे की, आम्ही 24 डिसेंबर 2021 रोजी गृहनिर्माण विभागाच्या निर्णयानंतर बॉम्बे डाइंगमधील 100 घरं ही टाटा रुग्णालयाला हस्तांतरित केली आहेत. टाटा रुग्णालयाने या पुढील कार्यवाही करायची आहे. यामध्ये म्हाडाकडून कुठल्याही प्रकारची दिरंगाई झालेली नाही. म्हाडाकडून गृहनिर्माण विभागाच्या निर्णयानुसार तयार घर ही टाटा रुग्णालयाच्या स्वाधीन करण्यात आली आहेत.
काय आहे बातमी?
टाटा रुग्णालयातील गरीब कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि कुटुंबीय अजूनही फुटपाथवरच राहत असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना राहण्यासाठी घर देण्याच्या गृहनिर्माण विभागाच्या निर्णयाला वर्ष उलटून गेले तरी रुग्ण फुटपाथवरच असल्याचं दिसून येतंय. मुंबईतील टाटा रुग्णालयात कॅन्सरवर उपचारासाठी देशभरातून रुग्ण येत असतात. एकीकडे कॅन्सरसारखा आजार आणि या आजारावर उपचारासाठी मुंबईत राहण्याचा प्रश्न अशा दुहेरी संकटात, बिकट परिस्थितीत कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांचे कुटूंब अडकले आहेत.
ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, अशा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मुंबईत खोली घेऊन राहण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून हे रुग्ण टाटा रुग्णालयाच्या फुटपाथवर राहत आहेत. पूर्ण ट्रीटमेंट होईपर्यत त्यांना फुटपाथवरच दिवस काढावे लागत आहेत.
पावसाचे दिवस असताना या रुग्णांचे आणि त्यांच्यासोबत आलेल्या कुटुंबियांचे प्रचंड हाल होत आहेत. पावसात फुटपाथवर राहता यावं यासाठी ताडपत्री टाकून दिवस काढण्याची आणि आपल्यासोबत रुग्णांची काळजी घ्यायची वेळ आता या कुटुंबियांवर आली आहे. अशा बिकट परिस्थितीत सरकारकडून किंवा मग रुग्णालय प्रशासनाकडून राहण्याची व्यवस्था व्हावी अशी आशा या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आहे.
मागील वर्षी महाविकास आघाडी सरकारच्या गृहनिर्माण विभागाने या कॅन्सरग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या उपचार होईपर्यंत घरे मिळावीत यासाठी निर्णय घेतला होता. मुंबईच्या बॉम्बे डाईंगमध्ये म्हाडा प्रकल्पातून त्यांना घरे देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला होता. घरे तयार असतानासुद्धा अजूनही रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही घरी राहण्यासाठी परवानगी दिलेली नाही.