मुंबई : मुंबईतील गिरणी कामगारांसाठी (Mill Workers) घरे देण्यासाठीच्या पात्रता निश्चितीबाबत आज मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) मोठी अपडेट दिली आहे. यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एक लाख 50 हजार 484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता सुरू असलेले विशेष अभियान आता म्हाडा कार्यालयाजवळील (Mhada Office) वांद्रे पूर्व येथील (Bandra East) एमआयजी क्रिकेट मैदानासमोर (MIG Cricket Ground) असलेल्या समाज मंदिर हॉलमध्ये होणार आहे. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत या ठिकाणी आपली कागदपत्रे जमा करावीत असे म्हाडाने आवाहन केले आहे. मुंबईतील 58 बंद अथवा आजारी गिरणी कामगारांना घरे देण्यात येणार आहे.
गिरणी कामगार आणि वारसांच्या पात्रता निश्चितीसाठी गिरणीमध्ये काम केल्याबाबत विहित केलेल्या 13 पैकी जास्तीत जास्त कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने http://millworkereligibility.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा mill worker eligibility या मोबाईल ॲपद्वारे अपलोड केले असल्यास त्यांना प्रत्यक्ष येऊन कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हाडाने सांगितले आहे. ऑनलाइन सुविधेअंतर्गत अद्यापपर्यंत 900 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ http://millworkereligibility.mhada.gov.in वर कागदपत्रे अपलोड करण्याच्या सुविधेचा लाभ घेत या अभियानात अधिकाधिक गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पात्रता निश्चितीचे विशेष अभियान हे गिरणी कामगार, त्यांच्या वारसांना घरे देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या अभियानात सहभागासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून गिरणी कामगार व त्यांचे वारस म्हाडा मुख्यालयात येत आहेत. परंतु, कागदपत्रे सोईनुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन यापैकी कोणत्याही एका प्रकारे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे वयोवृद्ध गिरणी कामगार यांना घेऊन प्रवास करत म्हाडा कार्यालयात येण्यापेक्षा कागदपत्र सादर करण्याकरिता ऑनलाइन सुविधा वापरावी असे आवाहन बोरीकर यांनी केले आहे.
गिरणी कामगार / वारसांनी खालीलपैकी जास्तीत जास्त कागदपत्रे सादर करावीत
1) गिरणी कामगारांचे ओळख पत्र ,
2) तिकीट नंबरची प्रत,
3) सर्विस प्रमाणपत्र ,
4) लाल पास,
5) प्रोव्हिडेंट फंड क्रमांक,
6) इ एस आय सी क्रमांक,
7) मिल प्रमाणपत्र प्रत,
8) हजेरी पत्र ,
9) लीव्ह रजिस्टर प्रत,
10) उपदान प्रदान आदेश ,
11) भविष्य निर्वाह निधि सेटलमेंट आदेशाची प्रत,
12) पगार पावती ,
13) आधार कार्ड आणि इतर तत्सम कागदपत्र