मुंबई :  राज्यातील सत्तेत शिवसेना (Shiv Sena Shinde Faction) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोबत असले तरी राज्यात भाजपच (BJP) नेहमी बॉस राहिला पाहिजे असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. मुंबईतील दादरमध्ये भाजप विस्तारकांच्या बैठकीत मार्गदर्शन करत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.  राज्यात आणि केंद्रात भाजपने इतर पक्षांसोबत आघाडी करण्यावर भर दिला असला तरी या आघाडीची सूत्रे आपल्याकडेच राहणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.


आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बैठकांना सुरुवात केली आहे. भाजपकडून निवडणूक जिंकण्यासाठी ग्राम पातळीवर मायक्रो प्लानिंग सुरू आहे. दादर येथील पक्ष कार्यालयात भाजप लोकसभा आणि विधानसभा विस्तारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आपल्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी आले असले, तरी राज्यात भाजप ईज ऑल्वेज बॉस हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. युती मधील सर्व पक्षांमध्ये समन्वय साधत त्यांचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले. पक्ष प्रथम आणि मी शेवटी आहे. इथं मी उभा आहे ते पक्षामुळेच आहे. मी पक्ष सोडून उभा राहिलो, तर माझेही डिपॉझिट जप्त होईल, असेही फडणवीस यांनी म्हटले. पंतप्रधान मोदींच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम विस्तारकांना करायचे आहे असे आवाहनही त्यांनी केले. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विस्तारकांना मार्गदर्शन करताना म्हटले की, स्वतःसाठी 10 तास, तर पक्षासाठी 14 तास द्या. गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील प्रभावित व्यक्तींना संपर्क करण्याचे आणि पक्षाची भूमिका, कार्य पोहचवण्याचे आवाहनही फडणवीस यांनी केले. 


मागील काही महिन्यांपासून भाजपने निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. विविध प्रचार मोहिमांद्वारे भाजपकडून केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार केला जात आहे. तर, दुसरीकडे विरोधकांनीदेखील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 


जागा वाटप कसे असणार?


राज्यात भाजपसोबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना,  राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आला आहे. त्याशिवाय, इतर छोटे घटक पक्षदेखील आहेत. मात्र, लोकसभेच्या जागा वाटपात भाजप सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. 


विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 90 जागा मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 40 ते 60 जागा दिल्या जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही भाजपच सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे.