मुंबई : म्हाडाने (Mhada) मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. सोडत जाहीर होत नसल्याने मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज केलेले अर्जदार संतप्त आहेत. अर्जदारांकडून म्हाडाला एकूण 519 कोटी रुपयांची अनामत रक्कम मिळाली आहे. म्हाडाने यापूर्वी 18 जुलै रोजी सोडत काढण्याची घोषणा केली होती, परंतु अर्जाची अंतिम मुदत वाढवून सोडत पुढे ढकलली. अजूनही म्हाडाने नवीन सोडतीची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे अर्ज केलेले एक लाखाहून अधिक अर्जदार सोडतीची तारीख जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
म्हाडा मुंबई मंडळाच्या 4082 सदनिकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 जुलैला संपली आहे. म्हाडाने यापूर्वी 18 जुलै रोजी सोडत काढण्याची घोषणा केली होती, परंतु अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवून सोडत सोडतही पुढे ढकलली. मात्र अजूनही म्हाडाने नवीन सोडतीची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे अर्ज केलेले एक लाखाहून अधिक अर्जदार सोडतीची तारीख जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत,होणाऱ्या विलंबामुळे अर्जदार आपला रोष समाज माध्यमावर मांडत आहेत.
गिरणी कामगारांसाठीच्या 2521 घरांची सोडत लवकरच निघणार
गिरणी कामगारांसाठीच्या रखडलेल्या 2521 घरांची सोडत लवकरच निघाणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई मंडळाने दीड लाख अर्जदारांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे. तसंच या यादीमधील कामगारांचा या सोडतीत सहभाग असेल. रांजनोळीतील 1 हजार 244 घरांची दूरवस्था झाली असून या घरांची दुरुस्ती नेमकी कोण करणार यावरून वाद सुरू आहे. तरीही म्हाडाने रांजनोळीसह उपलब्ध 2521 घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतलाय.
कोणत्या गटासाठी किती प्रतिसाद?
मुंबई मंडळातर्फे विक्री करिता जाहीर करण्यात आलेल्या 4082 सदनिकांमध्ये प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 1947 सदनिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव येथे असून या घरांकरिता 22 हजार 472 अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील 843 सदनिकांसाठी 28 हजार 862 अर्ज प्राप्त झाले आहेत आणि या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवार नगर विक्रोळी या योजनेकरिता प्राप्त झाले आहेत. या ठिकाणी 415 घरे आहेत. तसेच अल्प उत्पन्न गटातील 1034 सदनिकांसाठी 60 हजार 522 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगाव या योजनेकरिता आहेत. या ठिकाणी 416 घरे आहेत. तर मध्यम उत्पन्न गटातील 138 सदनिकांसाठी 8395 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज उन्नत नगर गोरेगांव येथील गृहनिर्माण योजनेकरिता आले आहेत. उच्च उत्पन्न गटातील 120 सदनिकांसाठी 2068 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज शिंपोळी कांदिवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरिता असल्याची माहिती म्हाडाच्यावतीने देण्यात आली आहे.