BEST Bus Workers Strike : मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप (BEST Bus Workers) सुरुच आहे. मुंबई बेस्ट परिवहन सेवेतील कंत्राटी कामगारांच्या संपाचा आज पाचवा दिवस आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे मुंबईकरांचे मात्र हात होत आहेत. पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सलग पाचव्या दिवशी सुरूच आहे. 


सलग पाचव्या दिवशी 'बेस्ट'चा संप सुरुच


पगारवाढ आणि बेस्टच्या सुविधा अशा विविध सुविधा ही कंत्राटी कर्मचारी मागणी आहे. हे सर्व कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तसेच जोपर्यंत आपल्या मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप सुरुच राहील, असा आक्रमक पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मुंबईत बेस्ट बसची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुलुंड, मुंबई सेंट्रल,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे.


राज्य सरकारचं महत्त्वाचं पाऊल


बेस्ट परिवहन सेवेतील कंत्राटदारांच्या अखत्यारीत असलेल्या कंत्राटी चालकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या (BEST Strike) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या संपामुळे सर्व सामान्य जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी खासगी वाहनांतून टप्पा प्रवासी वाहतूक करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. संप सुरू असेपर्यंत हे आदेश लागू असणार आहे. या निर्णयाबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे. 


खासगी वाहनातून टप्पा प्रवासी वाहतुकीला मंजुरी


बेस्टचा संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेता मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून यामध्ये सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी, खाजगी बसेस, स्कूल बसेस यांमधून प्रवाशांच्या वाहतूकीस संप संपेपर्यंतच्या कालावधीसाठी टप्पा वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येत आली आहे. 


बेस्टमध्ये कंत्राटी बसेसचा समावेश का?


बेस्ट प्रशासन आर्थिक अडचणीत सापडलं आहे. खर्च कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने आपल्या ताफ्यात कंत्राटी पद्धतीने बस ताफ्यात घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या. बस आणि चालक यांची नियुक्ती कंत्राटदाराकडून करण्यात येते. तर, निविदेत निश्चित केलेली रक्कम कंत्राटदाराला बेस्टला द्यावी लागते. यामुळे नवीन बस खरेदी आणि नवीन चालकांची नियुक्ती बेस्टला करावी लागत नाही. त्याच्या परिणामी बेस्टची काही प्रमाणात बचत झाली. कंत्राटदाराकडून बेस्टच्या मिनी एसी बस, एसी बस, इलेक्ट्रीक बस चालवण्यात येते. मुंबईत विविध आगारात वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून सेवा पुरवण्यात येते.