Metro 6 Car Shed Updates : ज्या कांजुरमार्ग मेट्रो कारशेडवरुन (Kanjurmarg Metro Car Shed) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजपमध्ये (BJP) जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. त्याच कांजूरमार्गमध्ये (Kanjurmarg News) मेट्रो 6 साठी कारशेडचा निर्णय घेण्यात आला आहे. कांजूरमार्गमध्ये मेट्रो 6 साठी कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रो कारशेडच्या 506 कोटींच्या प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. मेट्रो 6 साठी कारशेड उभारण्याच्या कामाला आता वेग येणार आहे. 


कांजूरमार्ग कारशेडसाठी राज्य सरकारच्या सूचनेनंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून 15 हेक्टर जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आता मेट्रो सहा मार्गेकेसाठी कारशेड उभारण्याचं काम जलद गतीनं सुरू करण्यात येईल. या कारशेड उभारणीच्या कामांमध्ये 18 स्टेबलिंग लाईन्स, वर्कशॉप, मेंटेनन्स लाईन, ऑटोमॅटिक ट्रेन वॉशिंग सुविधा, ऑपरेशनल कंट्रोल सेंटर आणि स्टाफ क्वार्टर्स यासारख्या अत्यावश्यक सुविधांचा समावेश असेल. कॉन्ट्रॅक्टरला इरादा पत्र प्राप्त झाल्यानंतर, प्रकल्प 30 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणं अपेक्षित आहे.


मेट्रो 6 मार्गिका ईस्टर्न आणि वेस्टर्न मार्गांना जोडणार असून जी स्वामी समर्थ मार्ग ते जोगेश्वरीपर्यंत असणार आहे. याच मेट्रो 6 मार्गिकेच्या कारशेडचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. 


मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेला 'मेट्रो 6' मार्गिका 


एकूण लांबी : 15.31 किमी
स्थानके : 13
खर्च : 6772 कोटी रुपये
कामाला सुरुवात : 2018
कारशेड : कांजूर येथे 15 हेक्टरवर
कुठे जोडली जाणार : मेट्रो 2 अ, मेट्रो 7, मेट्रो 3, मेट्रो 4, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे


'मेट्रो 6' मार्गिका कुठून कुठपर्यंत? 


'मेट्रो 6' ही मार्गिका पूर्वेकडे विक्रोळी ते पश्चिमेकडील जोगेश्वरीदरम्यान उभारण्यात येत आहे. या मार्गिकेवरुन पूर्व द्रुतगती मार्ग ते स्वामी समर्थनगर यादरम्यान मेट्रो धावणार आहे. एकूण 15.31 किमी लांबीच्या उन्नत मार्गिकेवर 13 स्थानकं असतील. प्रामुख्याने सध्याच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडला (जेव्हीएलआर) समकक्ष अशी ही मार्गिका धावणार आहे. यादरम्यान ही मार्गिका विक्रोळी आणि जोगेश्वरी, या दोन स्थानकांना पार करणार आहे. मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या उन्नत पुलांची उभारणी झपाट्यानं पूर्ण होत असताना आता सुविधांसाठी हालचाली वेगानं सुरू झाल्या आहेत.


पाहा व्हिडीओ : Mumbai Metro 6 Car Shade : मेट्रो 6 साठी कारशेडसाटी 506 कोटींच्या निविदा, कामाला वेग येणार