Merchant Vessel MV Chem Pluto: भारतात (India) येत असताना अरबी समुद्रात (Arabian Sea) हल्ला झालेलं जहाज अखेर मुंबईच्या (Mumbai News) किनाऱ्यावर पोहोचलं. जहाज समुद्रात असतानाच या जहाजावर दोन दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यानंतर या जहाजाला इंडियन कोस्ट गार्डच्या (Indian Coast Guard) जहाजामार्फत एस्कॉर्ट करण्यात आलं. इंडियन कोस्ट गार्डच्या सहाय्यानं अखेर जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर आणण्यात यश आलं आहे. 


23 डिसेंबरला सौदी अरेबियातून मंगळुरूला येणाऱ्या एमव्ही केम प्लुटो (MV Chem Pluto) या व्यापारी जहाजावर हल्ला झाला होता. या जहाजावर लायबेरियाचा ध्वज होता. या जहाजात 21 भारतीय होते. हे जहाज सोमवारी मुंबई बंदरात पोहोचलं आहे. नौदल या हल्ल्याची चौकशी करणार आहे.


संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमव्ही केम प्लुटो जहाजावर झालेल्या संशयित ड्रोन हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या हल्ल्यामुळे जहाजाचं किती नुकसान झालं, याचा तपास नौदलाचं पथक करत आहे. याशिवाय अरबी समुद्रात हा हल्ला कसा झाला? याचाही तपास सुरू आहे. यानंतर भारतीय नौदलाच्या युद्धनौका भारतीय आणि इतर जहाजांच्या सुरक्षेसाठी परिसरात गस्त घालणार आहेत. 






CGS Vikram नं केलं एस्कॉर्ट 


भारतीय नौदलानं दिलेल्या माहितीनुसार, या जहाजात 21 भारतीय आणि एक व्हिएतनामी नागरिक होते. त्यावर 23 डिसेंबर रोजी संशयास्पद ड्रोन हल्ला करण्यात आला होता. सोमवारी मुंबई बंदरात पोहोचल्यानंतर भारतीय नौदलाच्या एक्सप्लोझिव्ह ऑर्डिनन्स डिस्पोजल टीमनं जहाजाची प्राथमिक तपासणी केली.


ICGS विक्रम भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये गस्त घालण्यासाठी तैनात करण्यात आलं होतं. मालवाहू जहाजावरील हल्ल्याची माहिती मिळताच, ICGS विक्रमला ते एस्कॉर्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या.






इराणनं हल्ला केला, अमेरिकेचा दावा


या जहाजावरील हल्ल्यासाठी अमेरिकेनं इराणला जबाबदार धरलं होतं. इराणमधून सोडण्यात आलेल्या ड्रोननं या जहाजावर हल्ला केल्याचा दावा अमेरिकन संरक्षण विभाग पेंटागॉननं केला होता. मात्र, इराणनं हे दावे फेटाळून लावले.


हुथी बंडखोर जहाजांना लक्ष्य करतात 


इस्रायली जहाजावर हा हल्ला अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा अलीकडेच इराण समर्थित हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातून जाणाऱ्या इस्रायली जहाजांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला होता. हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील अनेक व्यापारी जहाजांनाही लक्ष्य केलं होतं. त्यामुळे व्यावसायिक जहाजांना त्यांचे मार्ग बदलण्यास भाग पाडलं जात आहे. नोव्हेंबरमध्ये, हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात एका मालवाहू जहाजाचंही अपहरण केलं होतं.