मुंबई : मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंकवर टोल वाचवण्यासाठी मर्सिडीज कारचालकाने खोटं पत्र दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बनावट कागदपत्र सादर केल्याचा आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सी लिंकवर 60 रुपयांचा टोल वाचवण्यासाठी संबंधित कारचालकाने खोटी कागदपत्र सादर केली. कागदपत्रांनुसार कारमालकाचं नाव भाविक भानुशाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. गुरुवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.
'मर्सिडीजवर प्रोटोकॉल स्टिकर होता. तर ड्रायव्हरने सादर केलेल्या पत्रात कारला टोलमाफी असल्याचं नमूद करण्यात आलं होतं' असं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी 'पीटीआय'ला सांगितलं.
मुंबई एन्ट्री पॉईंट्सवर डिसेंबर 2018 पर्यंत संबंधित मर्सिडीजला टोलमाफी असल्याचा उल्लेख पत्रात होता. त्यावर एमईपीएलचा लोगो आणि आणि उपाध्यक्ष तसंच एमडींची स्वाक्षरी होती. टोल कर्मचाऱ्याला संशय आल्याने त्याने पत्राचा फोटो काढून वरिष्ठांना पाठवला, मात्र तोपर्यंत ट्राफिक जाम झाल्यामुळे कार सोडून देण्यात आली होती.
संबंधित पत्र बनावट असल्याचं टोल कर्मचाऱ्याच्या वरिष्ठांकडून निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. पसार झालेल्या कारचालकाचा शोध सुरु आहे.