ठाणे : मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांना मी परवडणार नाही, म्हणूनच फेसबुक पेज सुरु केलं आणि त्यावर मी काढलेली व्यंगचित्र टाकतो. तुम्हीही सोशल मीडियावर व्यंगचित्र टाका, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.
ठाण्यात व्यंगचित्रकार संमेलनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या हस्ते व्यंगचित्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यंगचित्रकार प्रभाकर झलके यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. शिवाय ‘हास्यविवेक’ आणि ‘आक्रोश’ या दोन पुस्तकांचं राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं.
पत्रकार, साहित्यिक आणि व्यंगचित्रकार यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून भूमिका मांडली पाहिजे, असं आवाहन राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केलं. ठाण्यातील अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनाच्या हास्यदर्शन या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.