Mumbai Chaitya Bhoomi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चैत्यभूमीवर अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणावेळी म्हटलं की, 'माझ्यासारख्या सर्व सामान्य कुटुंबातील नागरिक आज मुख्यमंत्री झाला हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे घडलं. दलित समाजात रुजलेली न्यूनगंडाची भावना बाबासाहेबांननी काढून टाकली. दलित बांधवांमध्ये जो आत्मविशास निर्माण झाला, त्याचं श्रेय डॉ. आंबडेकरांना जातं.'
सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी इंदू मिल स्मारकाबाबतही वक्तव्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं की, इंदू मिलमधील स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही आढावा घेत पाहणी केली आहे. बाबासाहेब यांचा आठवणी जपण्याचा काम केलं जाईल. राजगृहवरील ऐतिहासिक ठेवा सुद्धा जपला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. इंदू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल.
चैत्यभूमीवर अभिवादनासाठी अनुयायांची गर्दी
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची गर्दी पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी रांग लागली आहे. त्यांना सर्व सुविधा देण्याचा काम राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. अनुयायांनी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुंबई महापालिकेकडे विशेष धन्यवाद व्यक्त करतो.
पाहा व्हिडीओ : संविधानामुळे सामान्य माणसांचं आयुष्य बदललं - एकनाथ शिंदे
महामानवाला विनम्र अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झालं. यामुळे संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव अशी ही पदवी देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब एक लेखक, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, आणि पत्रकारही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'भारतीय राज्यघटनेचे जनक' म्हणूनही ओळखलं जातं. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय होते ज्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली. अशा या महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी चैत्यभूमीवर येतात.