Mumbai News : गुजरातमधून आणलेली सिंहांची जोडी आज, मंगळवारी 6 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात येणार आहेत. ही सिंहांची जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातेतील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून मुंबईत दाखल झाली आहे. हे दोन्ही सिंह प्रत्येकी दोन वर्षे वयाचे आहेत. मुंबईतील वातावरणाशी परिचित होण्यासाठी काही काळ जाऊ देण्यात आला होता. आता मुंबईतील वातावरणाची पुरेशी सवय झाल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात त्यांना सोडण्यात येणार आहे. हे सिंह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाल्याने येथील बंद पडलेली सिंह सफारी पुन्हा सुरू होणार आहे.


 गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियायी सिंहाची जोडी (एक नर आणि एक मादी) मागील महिन्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली आहे. सिंहाच्या या जोडप्याची भर पडल्यानं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची शान वाढणार आहे.


 सिंहांची जोडी अवघ्या दोन वर्षांची 


ही सिंहांची जोडी अवघ्या दोन वर्षांची असल्याने पुढील अनेक वर्षे सिंह सफारीचा आनंद पर्यटकांना घेता येईल तसेच या सिंहांच्या पुढच्या पिढ्याही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात निर्माण होतील, असा विश्वास वन मंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.


भारतीय स्टेट बँकेने सिंह देखभालीसाठी दत्तक घेतले


मुनगंटीवार यांनी सांगितलं की, भारतीय स्टेट बँकेने हे सिंह देखभालीसाठी दत्तक घेतले आहेत.  वनमंत्री मुनगंटीवार यांनी हे सिंह देखभालीसाठी दत्तक घेण्याची सूचना बँकेला केली होती. त्यांची सूचना बँकेने तातडीने स्वीकारल्याबद्दल वनमंत्र्यांनी बँकेचे आभार मानले आहेत.


संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे 12 हेक्टर कुंपण क्षेत्रामध्ये 1975-1976 मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली होती. सिंह सफारीमुळे उद्यानाच्या महसुलात मोठी वाढ झाली होती. परंतु केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केल्याने येथील सिंहाची संख्या कमी झाली. गेल्या महिन्यात 17 वर्षे वयाच्या सिंहाचा मृत्यू झाल्याने उद्यानात एकच नर सिंह शिल्लक राहिला होता. त्यामुळे आता दोन सिंह आल्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची शान आणखी वाढणार आहे. 



ही बातमी देखील वाचा :
कोल्हापूर : सरपंच तुम्हीच व्हा; अर्ज भरल्याशिवाय अन्नाला शिवणार नाही! गावकरी महिलांसह ग्रामस्थांचा थेट घराला घेराव