Andheri Gokhale Bridge Demolition: अंधेरी (Andheri News) येथील गोखले ब्रिजच्या (Gokhale Bridge) पाडकामासाठी पश्चिम रेल्वेवर (Western Railway) दोन रात्रींसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 21 आणि 22 च्या रात्री तसेच 24 आणि 25 च्या मध्यरात्री साडेचार तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेतले जाणार आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेवरील काही लोकल आणि एक्सप्रेस गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच काहींच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे. गोखले ब्रिज पाडून त्याजागी लवकरात लवकर नवीन ब्रिज तयार करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येत आहेत.
अंधेरीतील गोखले ब्रीजच्या पाडकामाला 11 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला (Andheri West) जोडणारा गोखले पूल धोकादायक झाल्यामुळे तो पाडण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला होता. हा पूल तोडण्याच्या कामास प्रत्यक्षात 11 जानेवारीच्या रात्रीपासूनच सुरुवात झाली होती. यापूर्वीही या ब्रिजच्या कामासाठी प्रत्यक्ष मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या तोडकामासाठी पश्चिम रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात पोकलेन, जेसीबी, डंपर यासोबतच मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ देखील उपलब्ध करुन दिलं होतं. आता पुन्हा या ब्रिजच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.
गोखले ब्रिज बंद असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पश्चिम उपनगरातील वाहतुकीच्या दृष्टीने गोखले ब्रिज अत्यंत महत्त्वाचा आहे. वाहतुकीसाठी धोकादायक झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. नागरिकांना वाहतूक कोंडीत ढकलल्यानंतर मुंबई महापालिका आणि पश्चिम रेल्वे प्रशासन यांच्यात ब्रिजच्या रेल्वे लाईनवरील भाग कोण पाडणार? यावर 'तू तू मैं मैं' करायला सुरुवात झाली होती. गोखले ब्रिज बंद करत असताना मुंबई महापालिकेने या ब्रिजचा पश्चिम रेल्वे लाईनवरील भाग पाडण्याची तयारी करावी, या आशयाचं पत्र पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिलं होतं. त्यावर या संपूर्ण ब्रिज पाड काम हे मुंबई महापालिका करणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. अखेर याप्रकरणी एक सुवर्णमध्य काढत ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आली आहे.
गोखले ब्रिजबाबत प्रशासनाचा प्लॅन ऑफ अॅक्शन काय?
आता मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन समन्वय साधत युद्ध पातळीवर गोखले ब्रिज पुनर्बांधणीचं काम करत असल्याची माहिती आहे. गोखले ब्रिज रेल्वे लाईनवरील भाग पाडताना सुरुवातीला रस्त्यावरील डांबर काढले जाऊन नंतर डिव्हायडर आणि नंतर गर्डर पाडण्याचा काम केलं जाईल. मार्चमध्ये गर्डर पाडण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून पूर्ण केलं जाणार आहे. त्यानंतर पुनर्बांधणीचं काम तातडीने सुरु राहील.
नागपूरमध्ये पार पडलेल्या अधिवेशनात दिलेल्या माहितीनुसार, गोखले ब्रिजची एक लेन मार्च 2023 पर्यंत सुरु होईल असं मंत्र्यांनी सांगितलं. मात्र आता प्रत्यक्षात पहिली लेन सुरु होण्यासाठी मे 2023 उजाडणार आहे, तर दुसरी लेन डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. या सगळ्या गोखले ब्रिजच्या पुनर्बांधणीच्या कामाला 90 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र गोखले ब्रिज बंद झाल्याने एस बी रोड लिंक रोड शॉपर्स स्टॉप इर्ला जंक्शन अंधेरी स्टेशन पश्चिम या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आहे.