मुंबई : आता घरबसल्या कोविड-19 चाचणी करता येणार आहे. आयसीएमआरने कोविड-19 च्या चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी दिली आहे. हे एक रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट आहे. याचा वापर कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले किंवा बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले लोक करु शकतात. महत्त्वाचं म्हणजे घरात केलेल्या चाचणीचा अहवाल अॅपच्या माध्यमातून आयसीएमआरपर्यंत पोहोचेल आणि तिथे तो गोपनीय ठेवला जाईल. भारतात सध्या केवळ एकाच कंपनीला यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मायलॅब डिस्कव्हरी सॉल्युशन लिमिटेड (Mylab Discovery Solutions Ltd) असं या कंपनीचं नाव आहे.  


मीनल दाखवे भोसले यांच्या नेतृत्त्वात किटची निर्मिती
पुण्यातील Mylab मध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रमुख असणाऱ्या मीनल दाखवे-भोसले यांच्या नेतृत्त्वाखालील टीमने या किटचं डिझाईन तयार केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे किट तयार करताना त्या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. पुण्यातील एनआयव्ही या संस्थेत 18 मार्च 2020 रोजी किटची पहिली चाचणी घेण्यात आली. दुसऱ्याच दिवशी 19 मार्च रोजी मीनल यांनी मुलीला जन्म दिला. मग पाच दिवसात म्हणजे 23 मार्च 2020 रोजी त्यांनी अन् त्यांच्या टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता मिळाली. 





 




न जन्मलेला जीव स्वतःच्या उदरात मीनल दाखवे भोसले यांनी युद्ध लढलं!

खरंतर मागील वर्षी देशातील अनेक लॅब्ज किट्स बनवण्याचा प्रयत्न करत होत्या. पण एक जणही यशाच्या जवळ पोहोचत नव्हतं. त्यावेळी पुण्याच्याही एका लॅबने हे काम हाती घेतलं होतं. मिनल दाखवे भोसले यांनी आठ महिन्यांच्या अवघडलेल्या अवस्थेत हे शिवधनुष्य पेललं. खरंतर यावेळी स्वत:ची काळजी घेण्यास सांगितलं, जपायला सांगितलं जातं. 98 टक्के स्त्रिया तर घरीच राहणं पसंत करतात. स्वतः, कुटुंबीय, 10 जणांची टीम अन् एक न जन्मलेला जीव स्वतःच्या उदरात मीनल दाखवे भोसले यांनी हे युद्ध लढलं. 

 


 


 



मागील वर्षी 18 मार्चला चाचणी, 19 मार्चला प्रसुती आणि 23 मार्चला सरकारची मान्यता
गर्भारपणात काही तक्रारी आल्याने मीनल यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. फेब्रुवारीमध्ये त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी लगेच या किटवर काम सुरु केलं. दिवस-रात्र न थांबता या 10 जणांच्या टीमने काम केलं. प्रचंड मोठ्या कष्टाने सगळं प्रोपोजल ICMR, FDA आणि CDSCO या सरकारी अप्रुवल बॉडीला पाठवलं गेलं. 18 तारखेला सबमिशन करुन, तासाभरात हॉस्पिटलमध्ये सिझेरियनसाठी भरती झाल्या. 19 तारखेला त्यांनी गोंडस मुलीला जन्म दिला आणि पाच दिवसात म्हणजे 23 मार्च 2020 रोजी त्यांनी अन् त्यांच्या टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता मिळाली.


सध्या कोविड-19 चाचणीसाठी अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचणी केली जाते. अँटिजेन चाचणीचा अहवाल तातडीने मिळतो, तर आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल 24 तासात येतो. आता कोरोना चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे चाचणीला वेग येईल आणि लोक घरबसल्याच कोरोनाची चाचणी करु शकतात.