मुंबई : तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने होत्याचं नव्हतं झालं. घरांची पडझड झाली, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तर या वादळामुळे अनाथ होण्याची वेळ मुंबईतील वरळीत राहणाऱ्या दोन मुलांवर आली. वादळामुळे झाड कोसळून अंगावर पडल्याने संगीता खरात यांचा मृत्यू झाला. घरकाम करुन मुलांना शिक्षण देणाऱ्या संगीता खरात यांच्या दोन मुलांची कहाणी एबीपी माझाने दाखवली होती. त्यानंतर अनेक संस्था पुढे आल्या आहेत. अनेकांनी खरात कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली आहे. आता युवासेना या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचणार आहे. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. युवासेनेने मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलल्याने खरात कुटुंबियांचा अर्धा भार हलका झाला आहे.






संगीता खरात यांची करुण कहाणी
गरिबी आधीच पाचवीला पुजलेली. त्यात कधी घरकाम तर कधी भाजी विकून संगीता खरात आपलं घर चालवत होत्या. 20 वर्षापूर्वीच नवऱ्याने सोडल्याने संगीता खरात कुटुंबियांसाठी ढाल बनून उभ्या राहिल्या. संपूर्ण घराचा गाडा त्यांनी एकटीने हाकाला. पण चक्रीवादळानं ही ढाल मोडली. घरकाम करुन घरी येत असताना संगीत खरात यांच्या अंगावर झाड कोसळलं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.


खरात यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं आहेत. अभिषेक आणि अनिकेत अशी त्यांची नावं. ही मुलं आधीच बापाविना पोरकी होती त्यात आईचं छत्र हरपल्याने अनाथ झाली आहेत. 


लोकांची धुणीभांडी करुन संगीता मुलांच्या शिक्षणासह घरखर्च उचलत होत्या. पण त्यांच्या पश्चात आता काय? या मुलांच्या भविष्याचं काय होणार? असा प्रश्न भेडसावू लागला. आईची शिक्षण द्यायची ताकद नसल्याने मोठा मुलगा अनिकेतला शिक्षण सोडून मजुरी करावी लागली पण आपल्या नशिबी असलेले भोग आपल्या लहान भावाला मिळू नये याची चिंता त्याला सतावत होती. परंतु आता युवासेना शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याने खरात कुटुंबियांचा भार काहीसा हलका होण्यास मदत होईल.


दरम्यान राज्यात कोरोनाने आधीच लोकाचं कंबरडं मोडलं आहे. कोणाचा कसा मृत्यू होईल याची आता शाश्वती राहिली नाही. ठिकठिकाणी पंचनामे सुरु झाले आहेत. वादळाने अनेकांच्या घराचं छत उडालं आहे पण या मुलांच्या डोक्यावरचा मायेचा हात आता परत येणार नाही.  मुलांच्या शिक्षणासाठी धावपळ करणारी आईच आता नाही, त्यामुळे मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणजे आईच्याही आत्म्याला समाधान मिळेल.