Continues below advertisement

मुंबई : राज्यात एकीकडे शाळांमध्ये हिंदीच्या सक्तीवरुन सातत्याने वाद निर्माण होत असताना दुसरीकडे मराठी शाळा मात्र बंद पडत असल्याचं चित्र आहे. मुंबईतील मराठी (Mumbai Marathi School) शाळा या ठरवून बंद पाडल्या जात असून त्या वाचवण्यासाठी येत्या 14 डिसेंबर रोजी परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. मराठी अभ्यास केंद्राकडून (Marathi Abhyas Kendra) या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.

मराठी अभ्यास केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना या परिषदेचं निमंत्रण दिलं. मुंबईतील शिवाजी मंदिर येथे 14 डिसेंबर रोजी मराठी शाळांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी मुंबईतील मराठी शाळांतील विद्यार्थी, पालक प्रतिनिधींनी उपस्थित राहावं असं मराठी अभ्यास केंद्राकडून आवाहन करण्यात आलं आहे.

Continues below advertisement

Mumbai Marathi School : मराठी शाळा ठरवून बंद पाडल्या जातात

या संबंधी बोलताना आनंद भंडारे म्हणाले की, "मुंबईतील अनेक मराठी शाळा बंद पडल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. मुंबई महानगरपालिकेकडून ठरवून या शाळा बंद पाडण्याचा कारभार केला जात आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी आम्ही राज ठाकरे यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठी शाळांचा मुद्दा घ्या अशी विनंती केली. ती विनंती राज ठाकरे यांनी मान्य केली."

मुंबईतील एका इमारतीत पार्किंग लॉटमध्ये मराठी शाळा दिली. मग कोण पालक आपल्या मुलांना अशा शाळेत पाठवणार? आज मुंबईत मराठी शाळा ठरवून बंद पाडल्या तर भविष्यात राज्यभरातील सर्व मराठी शाळा बंद पडतील. गेल्या दोन वर्षात 28 पैकी 17 मराठी शाळा बंद पडल्या आहेत. मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल. त्यामुळे येत्या 14 डिसेंबर रोजी यावर परिषद घेणार आहोत असं आनंद भंडारे यांनी सांगितलं.

राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर नरेंद्र जाधव समिती स्थापन करण्याची गरज नव्हती. हा सगळा खटाटोप करून जर त्यांच्या अहवालात हिंदी सक्ती मान्य झाली तर आम्ही त्या अहवालाची होळी करू असं आनंद भंडारे म्हणाले.

Chinmayee Sumeet Marathi : प्रादेशिक पक्षांच्या भेटीगाठी

अभिनेत्री चिन्मयी सुमित म्हणाल्या की, "मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आम्ही अनेक वर्षे काम करतोय. मराठी भाषेचं जतन होण्यासाठी, भाषा टिकण्यासाठी आम्ही प्रादेशिक पक्षांना भेटतोय, नेत्यांच मत जाणून घेतोय. त्यांना आमच्या कामाची माहिती देतोय. या कामाचा आढावाी घेणारी पुस्तिका मराठी अभ्यास केंद्राने काढली आहे."

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर गिरीश सामंत म्हणाले की, "ही पुस्तिका काढणं योग्य आहे, पण यातील माहिती लोकांपर्यंत पोहोचवा असं राज ठाकरे म्हणाले. या आधी आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, आता हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेणार आहोत. राज्याचे जे सत्ताधारी आहेत त्यांना त्रिभाषा सूत्र आणायचं आहे. त्यामुळे सरकारमधील नेत्यांना भेटण्याचं ठरलं नाही. मराठीला डावलून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर वाद होणारच."

ही बातमी वाचा: