मुंबई : डीएन नगर ते गुंदवली स्थानकादरम्यान मेट्रो सेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांचा खोळंबा झाल्याचं चित्र आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे गेल्या दीड तासांपासून मेट्रो मार्गिका 2 अ आणि 7 वरील सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाल्याचं दिसून आलं. मात्र ही सेवा पूर्ववत करण्यासाठी मेट्रोची टीम युद्धपातळीवर काम करत असल्याचं मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
संध्याकाळी सहाच्या दरम्यान मुंबईकर प्रवाश करत असताना मेट्रो मार्गिका 2 अ आणि 7 वरील सेवा विस्कळीत झाल्याचं दिसून आलं. त्याच्या मोठा फटका प्रवाशांना बसला. त्यामुळे मेट्रो स्टेशनवर मोठी गर्दी झाल्याचंही दिसून आलं.
यासंदर्भात मुंबई मेट्रो प्रशासनाने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलं आहे. मेट्रो प्रशासनानं म्हटलंय की, "काही तात्पुरत्या तांत्रिक अडचणीमुळे मेट्रो मार्गिका 2अ आणि 7 वरील सेवांमध्ये विलंब होत आहे. प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मेट्रो सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आमची टीम युद्धपातळीवर कार्यरत आहे. कृपया सहकार्य करावे."
मेट्रोमध्ये झालेला तांत्रिक बिघाड हा लहान असल्याचं मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पण ऐन संध्याकाळच्या वेळी जवळपास दीड तासांहून मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे हा बिघाड लहान नक्कीच नाही. रविवारी, सुट्टीच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचा मात्र यामुळे मोठा खोळंबा झाल्याचं दिसून आलं.
ही बातमी वाचा: