Mumbai Crime : वसईतील श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) या तरुणीची तिच्या प्रियकराने हत्या करुन मृतदेहाचे 35 तुकडे केल्याची घटना ताजी असतानाच, आता मुंबई (Mumbai) पश्चिम उपनगरातील दहिसर भागात देखील प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दहिसर पोलिसांनी आरोपी प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहेत. अमेय दरेकर (वय 25 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचं नाव असून तो बोरीवली भागात वास्तव्य करत आहे. तर संबंधित तरुणी ही कॉल सेंटरमध्ये काम करते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अमेय दरेकर आणि जखमी झालेली तरुणी प्रियांगी सिंह (वय 24 वर्षे) हे दोघेही एकमेकांचे परिचित असून त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत. रविवारी (13 नोव्हेंबर) रात्री प्रियांगी आपला प्रियकर अमेय दरेकरला भेटण्यासाठी बोरीवली इथल्या त्याच्या निवासस्थानी गेली. तिथे त्यांच्यात काही वाद झाले. यानंतर संतापलेल्या अमेय दरेकरने प्रियांगीला इमारतीच्या टाकीवरुन धक्का मारुन ढकललं. यामुळे अंदाजे 18 फूट खाली पडल्यामुळे तिला गंभीर इजा झाली आहे.


रविवारी ही घटना घडली तेव्हा दोघांनीही मद्यपान केलं होतं. भांडण झाल्यानंतर आरोपी अमेयने प्रियांगीला टाकीवरुन ढकलून दिल्यामुळे तिच्या डोक्याला आणि कमरेला गंभीर इजा झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे अवस्थेत दुसऱ्या दिवशी सकाळी अमेय आणि त्याच्या आईने प्रियांगीला तिच्या आई-वडिलांच्या घरी आणून सोडलं आणि निघून गेले.


बेशुद्धावस्थेत प्रियांगीला घरी आणलं
यानंतर प्रियांगीचे वडील मुनिश सिंह (वय 46 वर्षे ) यांनी यासंदर्भात दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, प्रियांगी रात्री घरी आली नाही आणि तिचा फोन देखील स्विच ऑफ होता. सोमवारी (14 नोव्हेंबर) पत्नीसह मॉर्निंग वॉक करुन घरी आल्यावर मला माझी मुलगी बेडवर बेशुद्धावस्थेत दिसली. ती काहीच हालचाल करत नव्हती. तसंच तिच्या डोक्याला, पायाला आणि घोट्याला दुखापत झाल्याचं माझ्या लक्षात आलं. माझ्या घरातील नोकराने सांगितलं की अमेय आणि त्याच्या आईने तिला कारमधून घरी सोडलं. तेव्हा ती बेशुद्धच होती.


दावे-प्रतिदावे
दुसरीकडे, "प्रियांगीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या सध्याच्या अवस्थेशी अमेयचा संबंध नाही," असं दरेकर कुटुंबाने म्हटलं आहे. "माझी मुलगी इमारतीवरुन कोसळली नाही किंवा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नाही," असं मुनिश यांनी पोलिसांना सांगितलं. शिवाय अमेयने यापूर्वीही प्रियांगीला मारहाण केली होती, असा दावा त्यांनी केला. 5 सप्टेंबर रोजी रिक्षातून घरी येताना त्याने प्रियांगीला मारहाण केली होती. तसंच वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या रिक्षाचालकाही देखील मारलं होतं, असंही त्यांनी म्हटलं.


आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी
मात्र प्रकरण दहिसर पोलीस ठाणे हद्दीत घडलं असल्यामुळे पुढील तपास आता दहिसर पोलिसांना सोपवण्यात आला आहे. दहिसर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमेय दरेकरवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकर अमेय दरेकरला अटक करुन गुरुवारी (17 नोव्हेंबर) न्यायालयात हजर केलं. यावेळी कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


तरुणीवर मणक्याची शस्त्रक्रिया
दरम्यान कोकिलाबेन रुग्णालयात प्रियांगीवर मंगळवारी (15 नोव्हेंबर) सहा तासांची मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि 14 स्क्रू इम्प्लांट करण्यात आले.  तिची प्रकृती गंभीर असून तिच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.


VIDEO : Mumbai : मुंबईत प्रियकराने प्रेयसीला पाण्याच्या टाकीवरुन खाली ढकललं, पीडित तरुणी गंभीर जखमी