Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती उपोषणाला बसणार असल्याची माहिती 'एबीपी माझा'ला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.  मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.   'सरकारकडून मागील दीड वर्षापासून मागण्यांचा पाठपुरावा करून देखील मागण्या मान्य न झाल्यामुळे उपोषणाला बसण्याचा निर्णय संभाजीराजेंनी घेतला असल्याचे समजत आहे.


 काय आहेत मागण्या
1) मराठा आरक्षणामुळे 2014 ते पाच मे 2021 पर्यंतच्या शासन सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती द्याव्यात


2) 'ओबीसी'च्या धर्तीवर मराठा समाजाला सवलती लागू करा


3) 'सारथी' संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरू करावीत. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 'सारथी' संस्थेची उपकेंद्रे सुरू करून त्याठिकाणी शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत. संस्थेला एक हजार कोटींची तरतूद करुन तारादूत प्रकल्प तत्काळ सुरू करावा. 


4) अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरघोस नीधी मिळावा. लाभार्थी पात्रतेसाठी असलेल्या अटी शिथिल करत व्याज परताव्याची 10 लाख रूपयांची मर्यादा वाढवून ती किमान 25 लाख रूपये करावी.


5) शासनाकडून पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जातो. मुंबई, नागपूर, पुणे अशा महानगरांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 3000 रूपये व इतर ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 2000 रूपये प्रति महिना दिले जातात. ही रक्कम वाढवावी. 


6) शासनाकडून मागासवर्गीय वसतिगृहांच्या धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील पहिल्या टप्प्यात किमान प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वसतिगृहांची उभारणी करावी. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत  मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सुपर न्यूमररी सीट्स निर्माण कराव्यात.


खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अनेक दिग्गजांच्या भेटी घेतल्या


मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अनेक दिग्गजांच्या भेटी घेतल्या आहेत. राज्यभरातील अनेकांसोबत मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर त्यांनी चर्चा केली आहे. आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्विट करत याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. मराठा आरक्षणासाठी पुढील वाटचाल कशी असणार आहे याबाबतची दिशाही ठरवली आहे.