Maratha Reservation Manoj Jarange Patil agitation at Azad Maidan Mumbai: मराठा समजाला ओबीसी कोट्यातून आणि सगेसोयऱ्यांचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarane Patil) यांनी शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधव मुंबईत आले होते. मात्र, मुंबईत कालपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे (Mumbai Rain) मराठा आंदोलकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काल रात्रीपासून दक्षिण मुंबईत पावसाची संततधार आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांचा मुक्काम असलेल्या आझाद मैदानात सर्वत्र चिखल झाला आहे. अनेक ठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहे. मुंबई महागनरपालिकेने (BMC) शुक्रवारी याठिकाणी खडी आणि वाळू टाकून आझाद मैदानातील खड्डे बुजवले होते. मात्र, कालपासून सतत पाऊस पडत असल्याने ही वाळू आणि खडी वाहून गेली आहे. त्यामुळे आता आझाद मैदानात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आहे. या चिखलात मराठा आंदोलक आज दुसऱ्या दिवशी आंदोलनाला कसे बसणार, हा प्रश्नच आहे.

Continues below advertisement


कालपासून पाऊस असल्याने अनेक मराठा आंदोलकांनी रात्रभर आझाद मैदानाजवळील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात आसरा घेतला होता. मध्यरात्रीपासून आझाद मैदान परिसरात पाऊस कोसळतो आहे. यामुळे मैदान परिसरात चिखल झाला आहे. तरीदेखील मराठा आंदोलक मैदानात उपस्थित रहाण्यास सुरुवात झाली आहे. जोपर्यंत जरांगे पाटील यांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी व्यक्त केली आहे. बाहेर कुठे राहायची सोय आझाद मैदान च्या जवळ नसल्याने थेट सीएसएमटी स्टेशनवरच या आंदोलकांनी प्लॅटफॉर्मवर झोप काढली. अनेक जण आता झोपेतून उठून थेट आझाद मैदान गाठत आहेत आणि आंदोलनात सहभागी होत आहेत. जोपर्यंत आरक्षणाच्या मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मुक्काम हा सीएसएमटी स्टेशनवरच असेल अशा प्रतिक्रिया आंदोलकांनी दिल्या.


Maratha Reservation: शौचालयात पाणी नसल्याने मराठा आंदोलकांनी बिसलरीचं पाणी वापरलं


कालपासून आझाद मैदान आणि सीएसएमटी स्थानकाच्या परिसरात ठाण मांडून बसलेल्या मराठा बांधवांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे. येथील शौचालयांमध्ये काल रात्रीपासून पाणी नाही. आम्हाला पालिकेने पिण्याचे पाणी आणि साधा तंबूही उपलब्ध करुन दिला नाही. शौचालयात पाणी उपलब्ध नसल्याने एका मराठा बांधवाने ट्रकभरुन बिसलरीच्या बाटल्या आणल्या. या बाटल्या घेऊन मराठा बांधव शौचालयात गेले, असे एका मराठा आंदोलकाने सांगितले. आझाद मैदानात सगळीकडे पाणी तुंबलंय, आम्ही समुद्रात राहतोय, असे वाटते. आम्ही रात्रभर जागरण केले. एकही मराठा बांधव रात्रभर झोपला नाही. पावसामुळे आमचे सगळे कपडे ओले झाले, असेही या मराठा आंदोलकाने सांगितले. त्यामुळे आज राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका मराठा आंदोलकांची काही सोय करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.



आणखी वाचा


Maratha Reservatio LIVE: मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा दुसरा दिवस, आझाद मैदानात धो-धो पाऊस