मुंबई: मराठा समाजातील कुणबी नोंदी असणाऱ्या लोकांना आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठीच्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती सध्या प्रचंड खालावली आहे. त्यांनी अंतरवाली सराटी येथे १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाविरोधात डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी कोर्टात मनोज जरांगे यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.


मनोज जरांगे हे त्यांची प्रकृती कमालीची ढासळली असूनही उपचार घ्यायला तयार नाहीत. हा मुद्दा आजच्या सुनावणीवेळी मांडण्यात आला.  यावेळी राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्त्यांनी बाजू मांडली. मनोज जरांगे प्रशासनाला वैद्यकीय देखरेख करू देत नाहीत. ते रक्ताची तपासणी करण्यास नकार देत आहेत, असे त्यांनी सांगितले.  त्यावर जरांगे यांच्या वकिलांनी १४ फेब्रुवारीला मनोज जरांगे यांच्यावर प्राथमिक उपचार झाल्याचे सांगितले. त्यावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने काही प्रश्न उपस्थित केले. जर राज्य सरकार तुमची काळजी घेतंय तर, उपचार स्वीकारण्यात तुम्हाला काय अडचण आहे? भारताचे नागरीक या नात्यानं आंदोलन करणं हा तुमचा अधिकार, पण त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही, ही देखील तुमची जबाबदारी आहे.  कुठल्याही आंदोलनामुळे जनतेला त्रास होता कामा नये. मनोज जरांगे उपचार घेणार की नाही, हे पुढील १० मिनिटांत आम्हाला सांगा, असे खंडपीठान जरांगे यांच्या वकिलांना सांगितले.


खंडपीठाने विचारणा केल्यानंतर जरांगे यांच्या वकिलांनी आता त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, असे सांगितले.  मी त्यांचे हितचिंतक आणि समर्थकांच्या संपर्कात असून त्यांच्याकडून माहिती घेत आहे, असे वकिलांनी म्हटले. जरांगेंच्या वकिलाच्या या वक्तव्यावर डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला. त्यांनी म्हटले की, जरांगेचे वकील म्हणतात की, आम्ही त्यांच्या समर्थकांकडून प्रकृतीची माहिती घेत आहोत. जरांगे बोलण्याच्या परिस्थितीत नाहीत. मग ते प्रसारमाध्यमांसोबत कसे बोलतात? मीडियाच्या एका कॉलवर ते उपलब्ध आहेत. सत्य लपवण्यासाठी न्यायालयात खोटं सांगितले जात आहे. माझ्या मते मनोज जरांगे हे सेमी सबकॉन्शियस माइंडमध्ये आहेत, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.


जरांगेंच्या प्रकृतीची जबाबदारी कोणाची, हायकोर्टाचा जरांगेंच्या वकिलांना सवाल


या सुनावणीत खंडपीठाने जरांगे-पाटील यांच्या वकिलांवर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. जरांगे पाटील यांनी कालपर्यंत आवश्यक ते औषधोपचार घेतले. त्यांनी पाणीही प्यायले. जरांगेंचे उपोषण हे समाजासाठी आहे, स्वत:साठी नाही. आम्हाला जरांगेंच्या समर्थकांकडून ज्या सूचना येत आहेत, त्याआधारे आमचा युक्तिवाद सुरु आहे, असे जरांगेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने त्यांना विचारले की, तुमच्या मते जरांगे यांची प्रकृती स्थिर आहे का? कायद्यानुसार एखाद्याचे जीवन अडचणीत येत असेल तर पालक म्हणून योग्य उपचाराचा योग्य निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे. जरांगे यांचे वैयक्तिक डॉ. विनोद चावरे जो सल्ला देतील तो जरांगे यांना मान्य असेल का? जरांगेच्या प्रकृतीची जबाबदारी कुणाची? काही कमी जास्त झाल्यास डॉ. विनोद चावरे जबाबदारी घेतील का?, असे न्यायालयाने वकिलांना विचारले. त्यावर जरांगेच्या वकिलांनी मी त्याबाबत खात्री देऊ शकत नाही, असे म्हटले.


मनोज जरांगेनी उपचार घ्यावेत: उच्च न्यायालयाचे आदेश


मनोज जरांगे पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक जालना आणि डॉ. विनोद चावरे यांच्या माध्यमातून उपचार घ्यावेत, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे जरांगे पाटील यांना आता जालना सिव्हिल सर्जन यांच्या सूचनेनुसार उपचार घ्यावे लागणार आहेत. त्यांना सलाईन लावणे बंधनकारक असेल.


आणखी वाचा


मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अतिशय नाजूक, ग्लानीमुळे मान टाकली