Mumbai Fire : मुंबईतील ताडदेव भागातील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये आज लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला तर या घटनेत 22 जण जखमी झाले आहेत. मुंबईत आगीच्या घटना सतच घडत असतात. परंतु, आता ताडदेव भागातील घटनेमुळे मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाय योजना नसल्याचे समोर आले आहे. 


माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात 1 हजार 574 नोंदणीकृत रुग्णालये आणि नर्सिंग होम आहेत. यातील अनेक रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाय योजनांचे पालन केले जात नाही. शकील शेख यांनी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई अग्निशमन दलाला याबाबत अनेकदा पत्रे लिहूनही अनेक रूग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाय योजनांची सुविधाच नसल्याचे समोर आले आहे. याबरोबरच  संबंधित विभागाने अशा रूग्णालयांवर अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती, माहिती अधिकारातून उघड झाली आहे. 


शकील शेख यांच्या माहितीनुसार, गेल्या 10 महिन्यांत राज्यातील 6 रुग्णालयांना लागलेल्या आगीत 60 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे भविष्यात अशा अपघातांना आळा घालण्यासाठी शेख यांनी ज्येष्ठ वकील मुहम्मद झैन खान यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.


या याचिकेवर 29 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी 10 डिसेंबर 2021 पर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आणि शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर नर्सिंग होम, रुग्णालये आणि अग्निरोधक न चालवल्या जाणार्‍या नर्सिंग होमवर कारवाई करू शकतात असे सांगितले होते. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे उपप्रमुख अग्निशमन दल अधिकारी यांनी न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्रानुसार मुंबईतील 1 हजार 574 रुग्णालयांची पाहणी करण्यात आली असून यातील फक्त 687 रुग्णालयांकडेच अग्नी सुरक्षेबाबत नाहरकत प्रमाणपत्र आहेत. तर ज्या उर्वरित रूग्णालयांकडे नाहरकत प्रमाणपत्र नाही अशा रुग्णालयांना नोटीस पाठवल्या आहेत, असे सांगितले होते. 


न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मुंबई शहरातील 887 रुग्णालयांकडे अग्नी सुरक्षा उपाय योजना करण्याचे नाहरकत प्रमाणपत्र नाहीत तर ही रूग्णालये अद्याप बंद  का करण्यात आली नाहीत? असा प्रश्न शकील शेख यांनी उपस्थित  केला आहे. 


अशा घटनांकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं :  प्रवीण दरेकर 
मुंबईत आगीच्या घटनांमधून शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहेत. पालिकेने या घटनांकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात पाहणी करणे गरजेचे आहे. याबाबत सर्वपक्षीय बैठक घेऊन मुंबई शहरातील आगीच्या घटना कशा रोखता येतील यावर उपाययोजना करणे गरजेचे  आहे. शिवाय या घटनेतील दोषींवर कारवाई झाली पाहिजे. अशा अपघातांसाठी विशेष यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. आजच्या घटनेतील जखमींना ज्या रूग्णालयाने दाखल करून घेतले नाही त्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष  होत आहे. 50-50 मजली इमारतींसाठी फायर यंत्रणा नाही. आज घटना घडलेल्या इमारतीतील फायर यंत्रणा बंद होती मग महापालिकेची यंत्रणा काय करत होती? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.  


महत्वाच्या बातम्या