मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात येणार आहे. गृहंमत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत घोषणा केली आहे. भाजपने सचिन वाझे यांच्या विरोधात सभागृहात कालपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. आजदेखील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली. सचिन वाझें यांच्या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली.
सचिन वाझेंविरोधात भाजपची आक्रमक भूमिका
सचिन वाझे यांची बदली झाली यावर आम्ही समाधानी नाही. सचिन वाझे यांची बदली नाही तर त्यांचं निलंबन केलं पाहिजे, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे. जोपर्यंत सचिन वाझेंचं निलंबन होत नाही तोवर अधिवेशन चालू देणार नाही, असं दरेकर यांनी म्हटलं. ठाकरे सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालणारं सरकार आहे. या सरकारची प्रतीमा मलीन झाली आहे. सचिन वाझेंना तात्काळ अटक झाली आहे. त्यांचं निलंबन करुन त्यांची चौकशी झाली पाहिजे. सचिन वाझेंवर कारवाई करण्याची सरकारची मानसिकता नाही. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा?
सचिन वाझे प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज संध्याकाळी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणात विरोधकांनी सरकारची कोंडी केली आणि सत्ताधारी सभागृहात हा विषय हाताळू शकले नाही याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.
सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केली, विरोधकांना संशय
सचिन वाझेंचा तात्काळ अटक करा: देवेद्र फडणवीस
सरकार सचिन वाझे ना पाठिशी घालत आहे. वाझेंना तात्काळ अटक व्हायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काय केली होती. मनसुख हिरेन यांची गाडी स्फोटकं ठेवण्यासाठी वापरली, ती गाडी नोव्हेंबरपासून 5 फेब्रुवारीपर्यंत सचिन वाझे वापरत होते, असं त्यांच्या पत्नीने स्पष्टपणे सांगितलं. इतकंच नाही तर याप्रकरणाचा तपास केवळ सचिन वाझे यांनी केला. तीन दिवस ते रोज सचिन वाझेंसोबत जायचे आणि रात्री यायचे, हे देखील पत्नीने सांगितलं. माध्यमांनी मनसुख हिरेन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर आणलं. त्यांच्या पत्नीने सांगितलं, ते पत्रही स्वत: सचिन वाझे यांना वकिलांकडे देऊन पाठवायला लावलं. एवढंच नाही सचिन वाझे यांनी माझ्या पतीला तुम्ही दोन तीन दिवस अटक व्हा, मग मी बाहेर काढतो, असंही सांगितलं. माझ्या पतीचा खून सचिन वाझेंनी केला, असा जबाब पत्नीने दिला आहे."
कोण आहेत सचिन वाझे?
- सचिन वाझे 1990 मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबई पोलिसात ज्वाईन झाले होते. त्यांनी आतापर्यंत 63 एन्काऊंटर केले आहेत.
- नुकतंच Republic TV चे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांनी घरातून अटक केली होती. गोस्वामींच्या अटकेसाठी तयार केलेल्या टीमचं नेतृत्व सचिन वाझे यांनी केलं होतं.
- सचिन वाझे करीब 13 वर्षांनंतर 6 जून, 2020 रोजी पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले आहेत. त्यांनी 2007 मध्ये मुंबई पोलिसातून राजीनामा दिला होता.
- वाझे यांनी छोटा राजन आणि दाऊद इब्राहिमच्या अनेक गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा त्यांचे बॉस होते.
- सचिन वाझेंसह 14 पोलिस कर्मचाऱ्यांना 2004 मध्ये सस्पेंड करण्यात आलं होतं. या सर्वांवर 2002 घाटकोपर ब्लास्टचा आरोपी ख्वाजा यूनिसच्या कस्टोडियल डेथचा आरोप होता.
- सस्पेंशन काळ संपल्यानंतर नाराज होत त्यांनी 2007 मध्ये पोलिस फोर्सचा राजीनामा दिला.
- 30 नोव्हेंबर 2007 रोजी त्यांनी मुंबई पोलिसांची नोकरी सोडल्यानंतर 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.
- 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सचिन वाझे पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले.