मुंबई  : मनसूख हिरण प्रकरणी अखेर राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाला माघार घ्यावी लागली आहे. हा तपास एनआयएकडे सुपूर्द करा असे स्पष्ट आदेश ठाणे सत्र न्यायालयानं बुधवारी जारी केले आहेत. राष्ट्रीय तपासयंत्रणा म्हणजेच एनआयएनं याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयात मंगळवारी अर्ज दाखल केला होता, तो अर्ज स्वीकारत असल्याचं ठाणे सत्र न्यायालयानं बुधवारी स्पष्ट केलं.


एटीएसनं या प्रकरणी पत्रकार परिषद घेत मनसूख हिरण प्रकरणाचा छडा लावल्याचं मंगळवारी जाहीर केलं. याप्रकरणी सचिन वाझे हेच मुख्य आरोपी असल्याचंही एटीएसनं जाहीर करत तसे पुरावे सापडल्याचं माध्यमांपुढे जाहीर केलं. मात्र, या पत्रकार परिषदेला 24 तास पूर्ण होण्याआधीच हा तपास एनआयएला सुपूर्द करण्याची नामुष्की एटीएसवर आली आहे. त्यामुळे पर्यायानं राज्य सरकारलाच आता याप्रकरणी पुन्हा एकदा एक पाऊल मागे जाण्याची वेळ आली आहे.


केंद्र सरकारनं हा तपास एनआयएकडे देण्याची अधिसूचना यापूर्वीच काढलेली असतानाही एटीएसनं याप्रकरणी आपला तपास अद्याप का सुरू ठेवला आहे? आरोपींची कोठडी काशासाठी मागत आहेत? असा संतप्त सवाल उपस्थित करत कोर्टानं खडे बोल एटीएस आणि पर्यायानं राज्य सरकारला सुनावले आहेत. तसेच मनसूख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास तात्काळ थांबवून सारी कागदपत्रं, पुरावे, साक्षीदारांचे जबाब ताबडतोब एनआयएकडे देण्याचे निर्देशही एटीएसला देण्यात आले आहेत.


जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या दक्षिण मुंबईतील निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी सोडण्यात आली. त्या गाडीचा मालक मनसूख हिरण याच्या अचानक मृत्यूनंतर हे प्रकरण खूप गाजलं. त्यानंतर एनआयएनं याप्रकरणाची सारी सुत्र आपल्या हाती घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तचर शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. दरम्यान एनआयएनं याप्रकरणी बुधवारी एनआयए कोर्टात अर्ज दाखल करत सचिन वाझेंविरोधात अधिक सबळ पुरावे सापडल्याचं कोर्टाला सांगितलं. त्यामुळे सचिन वाझेंविरोधात काही नव्या कलमांखाली आरोप लावत असल्याचं त्यांनी कोर्टाला कळवलं. गुरूवारी सचिन वाझे यांची कोठडी संपत असल्यानं त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल. त्यामुळे आता वाझे यांची कोठडी वाढवून घेण्याचा एनआयएचा मार्ग मोकळा झाला आहे.