मुंबई: आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघात भाजपकडून ठाकरे गटाला धोबीपछाड देण्याची तयारी सुरू झाली आहे. तरुण खेळाडूंना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी या कालावधीत 'श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ' स्पर्धेचे आयोजन केले आहे. 


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई शहरात आणि उपनगरात प्रथमच देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. या स्पर्धेचे उ‌द्घाटन 26 जानेवारीला वरळीतील जांभोरी मैदान येथे होणार आहे. या स्पर्धेमध्ये लगोरी, लेझिम, लंगडी, पंजा लढवणे, दोरीच्या उड्या, रस्सीखेच, फुगडी, मल्लखांब, कबड्डी, मानवी मनोरे, आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, खो-खो, विटीदांडू, शरीर शौष्ठव, ढोलताशा या 16 पारंपारिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी सव्वादोन लाख खेळाडूंनी नोंदणी केली आहे. 


वरळीमध्ये ठाकरे विरूद्ध भाजप सामना रंगणार


दरम्यान, या स्पर्धांच्या आयोजनामुळे ठाकरे गट विरुद्ध भाजप असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. भाजपच्या या खेळनीतीला आता शिवसेना ठाकरे गटाकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहावं लागेल.


आदित्य ठाकरे यांनी 2019 साली वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते राज्याच्या मंत्रिमंडळातही होते. आगामी विधानसभा ही शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून एकत्रित लढवली जाणार आहे. 


वरळी मतदारसंघातून काहीही करून आदित्य ठाकरे यांचा पराभव करायचाच असा चंग भाजपने बांधला आहे. तसेच वरळी हा मतदारसंघ दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये येत असल्याने या ठिकाणी भाजपला आपली ताकत वाढवायची आहे. वरळी मतदारसंघात मराठी, गुजराती मतदारांची संख्या मोठी असून काही प्रमाणात मुस्लिम आणि उत्तर भारतीयांची संख्याही आहे. 


दक्षिण मुंबई मतदारसंघातून भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे इच्छुक आहेत. सध्या ही जागा जरी शिंदे गटाचा असली तरीही या मतदारसंघावर भाजपने आपला दावा केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघामध्ये मंगल प्रभात लोढा यांनी आपला संपर्क वाढवण्यावर भर दिलाय. 


ही बातमी वाचा: