मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील स्कूल बस नियमावलीची सक्ती तातडीने करण्यासंदर्भातील सूचना अप्पर पोलीस महासंचालकांनी (वाहतूक) परिवहन विभागाला दिल्या आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) विनंती पत्रानंतर स्कूल बसची नियमावली कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


मुंबईतील पोदार शाळेतील बस विलंबाने आल्याने विद्यार्थी वेळेवर घरी पोहोचू शकले नाही आणि पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागला होता. अशाच प्रकारच्या घटना इतर काही शहरांमध्ये सुद्धा घडल्याचं समोर आलं. यासंदर्भात मनविसे यांनी शालेय शिक्षण विभाग आणि पोलिसांना पत्र लिहून याबाबत नियमावली कडक करण्याची मागणी केली होती.


पंधरा दिवसांमध्ये नवे शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये सुरु असलेल्या बस सेवांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन भविष्यात असे प्रसंग उद्भवू नये म्हणून बसमध्ये जीपीआरएस बसवणं स्कूल बस मालकांना बंधनकारक असणार आहे. यासोबतच बस चालक आणि मदतनिसांची पोलीस पडताळणी बंधनकारक असेल.


पोदार स्कूल बसचं प्रकरण काय? 
मुंबईतील पोदार शाळेतील विद्यार्थी शाळा सुटून पाच तास झाले तरी घरी न पोहोचल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. सांताक्रूझमधील पोदार शाळेची ही बस होती. शाळा सुटल्यानंतर ही बस विद्यार्थ्यांना घेऊन घरच्या दिशेने निघाली, पण पाच तासांनंतरही विद्यार्थी घरी पोहोचले नाही. बस नेमकी कुठे आहे याची माहिती मिळत नव्हती. शिवाय पालकांनी स्कूल बसच्या ड्रायव्हरला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र ड्रायव्हर आणि बसमधील कर्मचाऱ्यांचा फोन स्विच ऑफ येत होता. या चिंताग्रस्त झालेल्या पालकांनी तातडीने शाळेकडे धाव घेतली होती. तसंच पोलीस प्रशासन, मनविसेचे पदाधिकारी पोदार शाळेत पोहोचून या ठिकाणी चौकशी केली. चालक नवा असल्याने आणि वाहतूक कोंडी या कारणाने विद्यार्थी घरी उशिरा पोहोचल्याचं शाळा प्रशासनाने त्यांना सांगितलं. शिक्षण उपसंचालकांनी या घटनेत झालेल्या निष्काळजपणा आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना झालेल्या मानसिक त्रासासंदर्भात संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पोदार शाळेला दिला होता.