Mumbai Missing School Bus :  शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणारी बस अजूनही न पोहोचल्याने पालकांची चिंता वाढली. सांताक्रूझमधील पोद्दार शाळेची ही बस आहे. शाळा सुटल्यानंतर ही बस विद्यार्थ्यांना घेऊन घरच्या दिशेने निघाली, पण अजूनही घरी पोहोचली नाही. त्यामुळे चिंतेत असलेल्या पालकांनी तातडीने शाळेकडे धाव घेतली. या स्कूल बसच्या चालकाचा मोबाइल स्वीच ऑफ येत असल्याने पालक धास्तावले होते. 'एबीपी माझा'वर वृत्त प्रकाशित होताच मुंबई पोलीस अधिकऱ्यांनी ही बस विद्यार्थ्यांसह सापडली असल्याची माहिती दिली. मात्र, या दरम्यान स्कूल बस नेमकी कुठं होती, शाळेसोबत अथवा पालकांसोबत कोणताही संपर्क का झाला नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 
 
नेमकं प्रकरण काय?


मुंबईतील सांताक्रूझमध्ये पोद्दार स्कूल आहे. या शाळेची विद्यार्थ्यांना ने-आण करणारी बस आहे. आज नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घरातून घेऊन शाळेत आली. दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यानंतर, विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी ही बस निघाली. मात्र बस शाळेतून बाहेर जरी पडली असली तरी ती बस घरापर्यंत पोहोचलीच नाही. 


बस नेमकी कुठे होती? 


शाळा सुटून जवळपास 4 तास होत आले तरी बसचा अद्याप पत्ता लागला नव्हता. ही बस नेमकी कुठे होती. याचाही तपास सुरू करण्यात आला आहे.  


पालक चिंतेत


दरम्यान, शाळेला गेलेली लहान मुलं अजूनही घरी न पोहोचल्याने विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत होते. पालकांकडून शाळा प्रशासनाला, स्कूल बसचालकाला फोन लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हे विद्यार्थी सकाळी 6 वाजता शाळेत गेले आहेत. मात्र अजूनही घरी न परतल्याने पालकांची चिंता वाढली होती.


ड्रायव्हरचा फोन स्विच ऑफ 


शाळेला गेलेली मुलं अजूनही घरी न परतल्याने, पालकांनी आपआपल्या परीने संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे. पालकांनी स्कूलबसच्या ड्रायव्हरला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र ड्रायव्हर आणि बसमधील कर्मचाऱ्यांचा फोन स्विच ऑफ येत होता.


बसमध्ये नेमकी किती मुलं? 


प्राथमिक माहितीनुसार बसमध्ये 15 पेक्षा जास्त मुलं असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र अधिकृत माहिती मिळालेली नाही. ही मुलं नेमकी कोणत्या वयोगटातील आहेत, बसमध्ये मुला-मुलींची संख्या किती, याबाबतची कोणतीही अपडेट अजून मिळालेली नाही.