Majha Maharashtra Majha Vision : जो पर्यंत आपण देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर गांभीर्याने विचार करत नाहीत तोवर देशातील प्रश्न सुटणार नाहीत. लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्ती करावी लागेल, नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल. याबाबत ठोस निर्णय घ्यावे लागतील. वाढणारी लोकसंख्या आणि विकासकामे यांचा ताळमेळ जमत नाहीये, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं. राज ठाकरे एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते. 


स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाची प्रगती झाली यात शंका नाही. मात्र रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे, हातात मोबाईल येणे याला मी प्रगती म्हणणार नाही. देश म्हणून  आपण वैचारिक प्रगती केली का? देश म्हणून आपण विचार करतोय का? आपण अजूनही भागा भागात विचार करतोय. देशात प्रगतीच्या व्याख्या काय आहेत? आजही आपल्या निवडणुकीतले विषय बदलेले नाहीत. वीज, पाणी, रस्ते, शिक्षण याच विषयावर निवडणुका लढवल्या जात असतील तर आपण कशात प्रगती केली? याचा विचार झाला पाहिजे, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं. 


शिक्षणाचा प्रश्न दरवर्षा कोर्टात का जातो. याआधी असे प्रश्न उपस्थित होत नव्हते. दरवेळी विद्यार्थ्यांचे हाल होतात. याला आपण प्रगती म्हणणार का? आपल्याकडे उपलब्ध नोकरी प्रमाणे मुलांना शिक्षण मिळणार आहे का? असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.


राजकारण्यांच्या स्वार्थामुळे शहरांची बकाल अवस्था 


मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील अनधिकृत घरांना अधिकृत केलं जातं. राजकीय फायद्यासाठी शहरांची बकाल अवस्था होत आहे. जो खरा करदाता आहे त्याला ज्या गोष्टी मिळायला हव्या त्या मिळत नाही. बाहेरुन लोक येत असल्याने शहरं अनधिकृतपणे विस्तारत आहेत. छोट्या गावांची शहरं होत आहे. मात्र त्यांना शहरं म्हणू शकत नाही अशी त्यांची अवस्था आहे. मतांच्या राजकारणासाठी कायद्यांची अमंलबजावणी केली जात नाही. विकासाबाबत बोलताना याचा विचार होणे गरजेचं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.   


इंदिरा गांधींच्या काळापासून अंतर्गत राजकारणात लक्ष वाढलं


पंडित नेहरुंच्या काळात देशाच विकास झपाट्याने झाला. कारण त्या काळात त्यांना कुणी विरोधक नव्हते. इंदिरा गांधींच्या काळापासून विरोधक निर्माण झाले, त्यामुळे अंतर्गत राजकारणात लक्ष जास्त दिलं गेलं. त्यामुळे देशाच्या विकासाकडून लक्ष हटलं आणि आपल्या आपल्या भागाचा विचार केला गेला. अनेकांनी राज्याचा, देशाचा विचार केला. मात्र त्यांना म्हणावी तेवढी संधी मिळाली नाही. देशासाठीच्या विकासाच्या गोष्टींसाठी एक तज्ज्ञ मंडळी असणे आवश्यक आहे. हे ज्या दिवशी या देशामध्ये होईल, त्यावेळी देशाचा खरा विकास होईल.