Majha Maharashtra Majha Vision : आणीबाणीच्या काळ देशाला न शोभणारा काळ असं बोललं जातं. आणीबाणीचा काळाची आजही चर्चा होते. सध्याही तशीच परिस्थिती देशात दिसून येते आहे, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्र सरकारवर निशाणा साधला. आज सर्रासपणे केंद्रीय संस्थांचा गैरवापर होताना दिसतो आहे. अनेकांवर सूडबुद्धीने कारवाई होताना दिसतेय. मागे एका वर्तमानपत्रांवर ईडीची छापेमारी झाली. काही पुस्तकांना टोकाचा विरोध होतांना दिसतो. अशा घटना समोर येत आहेत. गेल्या पाच-सात वर्षात ही अस्वस्थता समोर येत आहे. या गोष्टी माझ्यासाठी आणि माझ्या सारऱ्या अनेकांसाठी खुप नवीन आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हणत केंद्र सरकारवर टीका केली.
राजकीय मतभेद असलेच पाहिजे, पण राजकीय द्वेष असायला नको. अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह, राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात संसदेत एखाद्या विधेयकावर चर्चा होत असताना विरोधकांनी सूचवलेल्या दुरुस्त्यांचं आनंदाने स्वागत केलं जात होतं. कारण संसदेत होणारी चर्चा ही सामाजिक हितासाठीच असते. आताच्या सरकारने आम्ही सुचवलेले मुद्दे मान्य केले तर समाजासाठी चांगलं होईल, असं सुप्रिया सुळे यांनी सुचवलं. तर संसदेत चर्चा होतेच, मात्र त्याबाहेर होणारी चर्चा देखील महत्त्वाची असते. ऐकूण घेण्याची क्षमता मोठ्या नेत्यामध्ये असणे हा चांगला गुण आहे. मात्र केंद्र सरकारमध्ये ऐकण्याची क्षमता कमी आहे, असं दिसून येत आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
भारत आणि इंडिया यातील फरक नव्या पीढीत कमी कमी होतोय : सुप्रिया सुळे
मागील काही वर्षामध्ये जात, धर्म हा विषय कधी कॉलेज, शाळा, कार्यालयांमध्ये चर्चेला नव्हता. मात्र गेल्या काही वर्षात हे जाणवू लागलं आहे. पण नवीन पीढीला जात, धर्म या गोष्टी हव्या आहेत असं वाटत नाही. त्यांना या गोष्टींमध्ये फार रस नाही. त्यांना मेरिट आणि परफॉर्रमन्स हवं आहे. त्यांचा चांगलं दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केले जातात. भारत आणि इंडिया यातील फरक नव्या पीढीत कमी कमी होत आहे. राहणीमान, खाणपान यातील सामाजिक फरक आता कमी होत आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
आगामी काळातील नेतृत्व पुरोगामी विचाराचं असावं
आगामी काळातील नेतृत्व पुरोगामी विचाराचं असावं. सर्वांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व असावं. समाजात तेढ किंवा कटुता निर्माण करणे राजकीय लोकांसाठी कदाचित चांगली गोष्ट असेल. मात्र त्याचे देशावर किंवा राज्यावर चांगले परिणाम दिसतील असं वाटत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. कुठलाही देश स्वत:ला अलग करुन टिकणार नाही. आत्मनिर्भर भारत चांगली योजना आहे. मात्र जगभरात इतर देशांसोबत आयात निर्यातही गरजेची आहे. कोरोना काळातही लसींसंदर्भात वेळेत काही निर्णय घेतले असते तर परिस्थिती वेगळी असती, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
सरकारविरोधात बोलताना सतत घाबरलेले दिसतात
देशात दडपशाही सातत्याने दिसते. लोक सरकारविरोधात बोलताना सतत घाबरलेले दिसतात. मोबाईलवरही बोलणे सध्या कठीण बनलं आहे. लोकांवर लक्ष ठेवले जातं. आपल्याच नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना देखील यांनी सोडलं नाही, त्यांच्यावरही देखील लक्ष ठेवलं गेलं, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.