Sundeep Waslekar on Majha Katta : रशियाचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी 1986 साली दिलेली अण्वस्त्र नष्ट करण्याची ऑफर अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी नाकारल्याने आज संपूर्ण जग पुन्हा एकदा अणुयुद्धाच्या भीतीच्या सावटाखाली उभं आहे असं मत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संदीप वासलेकर (Sundeep Waslekar) यांनी मांडलं. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते. 


अर्थकारण, समाजकारण, राजकारण, उद्योग, शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय संबंध या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणारे डॉ. संदीप वासलेकर (Sundeep Waslekar) यांनी विश्वशांतीसाठी अनेक प्रयत्न केले आहेत. अनेक देशांतील वाद मिटवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी जागतिक शांतीसाठी अतुलनीय योगदान दिलं आहे. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात संदीप वासलेकर यांनी मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या आठवणींना उजाळा देत अनेक रंजक गोष्टी सांगितल्या आहेत. 


गोर्बाचेव्ह यांच्या आठवणींना दिला उजाळा


रशियाचे प्रमुख नेते म्हणून 1985 साली मिखाईल गोर्बाचेव्ह यांची निवड झाली. नेतेपदी आल्यानंतर लगेचच त्यांनी मोठ-मोठे बदल करायला सुरुवात केली. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत. 


डॉ. संदीप वासलेकर यांचा अभिमानास्पद प्रवास


आंतरराष्ट्रीय घडामोडींचे जाणकार, लेखक, विचारवंत, जगभरातील 50 हून देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी ज्यांचा विविध विषयांवर सल्ला घेतलाय असे अभ्यासक अशी डॉ. संदीप वासलेकर यांची ओळख आहे. कॉलेजच्या जीवनात आंतरराष्ट्रीय अर्थकारणावर त्यांनी लिहिलेल्या एका लेखाचं केवळ देशातच नाही तर जगभरात कौतुक झालं होतं. त्यानंतर त्यांना थेट ऑक्सफर्डची स्कॉलरशीप मिळाली. आंतरराष्ट्रीय अर्थकारण, राजकीय आणि प्रशासकीय धोरण हे त्यांचे अभ्यासाचे विषय असले तरी वैश्विक शांतता या बाबींमध्येही त्यांनी मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 


भारत आणि पाकिस्तान संबंध, भारत आणि नेपाळ संबंध त्याचबरोबर इस्लामी देश आणि पाश्चिमात्य देश यांच्यामधला दुवा म्हणूनही डॉ. संदीप वासलेकर यांनी आपलं योगदान दिलं आहे. डॉ. वासलेकर यांनी त्यांच्या अनुभवांवर लिहिलेली 'धर्मराज्य', 'साऊथ एशियन ड्रामा' आणि 'एका दिशेचा शोध' ही पुस्तकं अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. डॉ. वासलेकर यांनी डोंबिवली सारख्या छोट्या उपनगरापासून सुरुवात करून जगाच्या राजकारणात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. 


1993 च्या 1 आणि 2 मे रोजी वासलेकर यांनी अण्वस्त्र  निशस्त्र करण्यासंबंधी एक जागतिक परिषद दिल्लीत बोलावली होती. त्यासाठी त्यांनी जगातल्या 26 पंतप्रधानांना आणि राष्ट्रपतींना बोलावलं होतं. त्यांनी मान्यता दिली होती. पण तरीही गोर्बाचेव्ह येत नाही तोपर्यंत त्यांना कुठेतरी अपूर्ण वाटत होतं. त्यामुळे त्यांनी गोर्बाचेव्ह यांनादेखील कळवलं. त्यांनीही होकार दिला. 1986 साली गोर्बाचेव्ह यांनी दिलेली अण्वस्त्र नष्ट करण्याची ऑफर अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी नाकारल्याने आज संपूर्ण जग पुन्हा एकदा अणुयुद्धाच्या भीतीच्या सावटाखाली उभं आहे. मला खरोखर शंका वाटते की पुढल्या 20-25 वर्षांमध्ये कदाचित संपूर्ण सृष्टीचा नायनाट होऊ शकतो, असे मत डॉ. वासलेकर यांनी माझा कट्ट्यावर मांडले. 


अणुयुद्धाच्या दिशेने पहिलं पाऊल केव्हा उचललं जाईल?


अमेरिका, रशिया, चीन या तीन पैकी कोणत्याही दोन राष्ट्रांत युद्ध होण्याची शक्यता आहे. निशस्त्रासंबंधी डॉ. वासलेकर पाच देशांच्या राजदूतांना भेटले आहेत. तर त्यांनीही काहीही झालं तरी अणुयुद्ध होऊ देणार नाहीत याचं वचन दिलं आहे. त्याची ग्वाही देणारं एक पत्र पाच जणांनी संयुक्तपणे 3 जानेवारी 2022 रोजी जाहीर केलं आणि ते जगभर प्रसिद्ध केलं. इंटरनेटवर कोणालाही ते पाहता येईल. त्यावर पाचही देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या सह्या आहेत. आणि त्यांनी जगाला एक हमी दिलेली आहे की, काही करून युद्ध होऊन देणार नाही. यात एक असा भाग आहे की ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत असे देश कोणत्याही कारणावरून आपापसात युद्ध करणार नाहीत. तर आता युक्रेनमध्ये चालणारं युद्ध अप्रत्यक्ष युद्ध आहे. ते प्रत्यक्ष युद्ध नाही आणि म्हणून अणुयुद्ध होऊ शकणार नाही असं म्हटलं जात आहे. त्यामुळेच अमेरिका किंवा युरोपमधील त्यांचे सहकारी देश युक्रेनला शस्त्र पाठवत आहेत. पण ते प्रत्यक्ष आपले सैनिक पाठवून भाग घेत नाहीत. म्हणजे ते फरक करतात की युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा करतो पण आम्ही आमचे अधिकारी पाठवून सैन्यात भाग घेणार नाही. जर अमेरिकेने सैन्य पाठवलं तर प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होईल आणि अणुयुद्धाच्या दिशेने पहिलं पाऊल उचललं जाईल. म्हणून ते टाळलं जात आहे, असे डॉ. वासलेकर 'माझा कट्टा' या कार्यक्रमात म्हणाले. 


डॉ. वासलेकर म्हणाले, "रशियाकडे एक अॅवॉनगॉड नावाचं मिसाईल आहे. अॅवॉनगॉडमध्ये ध्वनीचा जो वेग आहे त्याच्या 27 वेगानं ते जातं. हे क्षेपणास्त्र जाताना स्वत:चा मार्ग स्वत: ठरवतं. खाली एकदा प्रोगॅमिंग केलं की पुढचा मार्ग तो स्वत: ठरवतो. मिलिट्रीचे कमांडर ठरवत नाहीत. तर आता अशाप्रकारचे नवीन क्षेपणास्त्र आली आहेत. मागच्या 70-75 वर्षांमध्ये दोन-तीन वेळा तरी अमेरिका आणि ब्रिटनने अण्वस्त्र वापरायचा विचार केला होता".



संबंधित बातम्या


DR. Raghunath Mashelkar : डॉ रघुनाथ माशेलकरांची जाहिरातीची 'ती' आयडिया ठरली बेस्ट; पंतप्रधानांनी भर कार्यक्रमात केलं कौतुक


पहिल्या मॅरेथॉनमध्ये 100 रुपये बक्षीस मिळवलं, बीड ते बर्मिंगहॅम अडथळ्याच्या शर्यतीची अविनाश साबळे याची यशोकहाणी