Mahayuti Protest March : आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखाली ठाकरे गट 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर (Mumbai Municipal Corporation) भव्य मोर्चा काढणार आहे. आता आदित्य ठाकरे यांच्या या मोर्चाला महायुती देखील प्रत्युत्तर देणार आहेत. 'चोर मचाये शोर'चा नारा देत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला भाजप-शिवसेना आणि आरपीआय महायुती  (Shiv Sena BJP RPI Alliance) प्रत्युत्तर देणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या मोर्चा विरोधात भाजप युवा मोर्चाने (BJYM) रस्त्यावर उतरण्याची रणनिती आखली असून, या मोर्चात भाजपसोबत शिवसेना आणि आरपीआय देखील सहभागी होणार आहे. 


नरिमन पॉईंट इथल्या भाजपच्या कार्यालयातून मोर्चाला सुरुवात होणार


भाजपच्या नरिमन पॉईंट (Nariman Point) येथील प्रदेश कार्यालयातून शनिवारी या मोर्चाला सुरुवात होणार आहे. ठाकरेंविरोधात महायुती रस्त्यावर उतरत शक्तिप्रदर्शन करणार आहे. मागील 25 वर्षात सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जो भ्रष्टाचार केला त्याची पोलखोल महायुती या प्रत्युत्तर मोर्चातून करणार आहे, असं भाजयुमोतर्फे सांगण्यात आलं आहे.


1 जुललै ठाकरे गटाचा मुंबई मनपावर विराट मोर्चा, आदित्य ठाकरे नेतृत्व करणार


शिवसेना ठाकरे गट उद्या म्हणजेच 1 जुलैला मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना नेत्यांसह आदित्य ठाकरे करणार आहेत. या मोर्चाची घोषणा घोषणा माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 20 जून रोजी केली होती. मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुंबई मनपाच्या ठेवी म्हणजेच जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येईल असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. 


ठाकरे गटाच्या मोर्चाचा मार्ग बदलणार


शिवसेना ठाकरे गटाच्या बीएमसीविरोधातल्या मोर्चाचा मार्ग बदलणार आहे. पोलिसांच्या सूचनेनंतर ठाकरे गटाकडून नव्या मार्गाच्या उल्लेखासह पत्र दिलं जाणार आहे. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर ठाकरे गटानं पोलिसांसोबतचर्चा केली त्यानंतर मोर्चाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी मेट्रो सिनेमा ते टाईम्स ऑफ इंडिया इमारत या मार्गावरुन मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात यावी, अशा आशयाचं पत्र ठाकरे गटाने पोलिसांना दिलं होतं. मात्र, कायदा आणि सुवेस्थेच्या प्रश्नावरुन या मार्गावरुन मोर्चाला परवानगी देण्यास अडथळे होत असल्याची बाब सांगत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर पोलीस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या चर्चेनंतर मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला आहे. या मोर्चाची परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटाने पुन्हा एकदा पोलिसांना पत्र दिलं आहे. त्यावर पोलीस निर्णय घेणार आहेत.


हेही वाचा


ठाकरे गटाचा 1 जुलैला विराट मोर्चा; मेट्रो सिनेमा ते थेट बीएमसी मुख्यालय मार्ग ठरला, पण अद्याप पोलीस परवानगीची प्रतीक्षा