Thackeray Group BMC Morcha: ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नेतृत्वात ठाकरे गट येत्या 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर (Brihanmumbai Municipal Corporation) भव्य मोर्चा काढणार आहे. पण यामोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. अशातच आता शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाच्या बीएमसी (BMC) विरोधातल्या मोर्चाचा मार्ग बदलणार आहे. पोलिसांच्या सूचनेनंतर ठाकरे गटाकडून नव्या मार्गाच्या उल्लेखासह पत्र दिलं जाणार आहे. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर ठाकरे गटानं पोलिसांसोबत (Mumbai Police) चर्चा केली त्यानंतर मोर्चाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.  


मिळालेल्या माहितीनुसार, 1 जुलैच्या मोर्चाची परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटानं पुन्हा एकदा पोलिसांना पत्र दिलेलं आहे. यावर उद्यापर्यंत मुंबई पोलीस निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी मेट्रो सिनेमा ते टाईम्स ऑफ इंडिया इमारत या मार्गावरुन मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात यावी, अशा आशयाचं पत्र ठाकरे गटानं पोलिसांना दिलं होतं. मात्र, कायदा आणि सुवेस्थेच्या प्रश्नावरून या मार्गावरुन मोर्चाला परवानगी देण्यास अडथळे होत असल्याची बाब सांगत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर पोलीस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या चर्चेनंतर मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला आहे. 


तात्काळ दुसऱ्या मार्गाची पाहणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी केली. बदललेला मार्ग मेट्रो सिनेमा ते थेट महानगर पालिकेच्या इमारतीपर्यंत असेल, अशी माहिती मिळत आहे. बृहन्मुंबई महानगर पालिका गेट नंबर दोनच्या बाजूच्या रस्त्याला स्टेज असेल याठिकाणी भाषणं होतील. या मार्गाची पाहणी करताना स्वतः पोलीस अधिकारी आणि ठाकरे गटाचे नेते होते. त्यामुळे या मार्गाला परवानगी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. 


दरम्यान, मुंबई महापालिकेतील गैरकारभाराबाबत कॅगच्या अहवालानंतर एसआटी चौकशी सुरु आहे. मात्र सध्या मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे. याकडेच लक्ष वेधण्यासाठी आणि महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी रोखण्यासाठी ठाकरे गट मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. तसेच, ठाकरे गटानं मोर्चासाठी सर्व तयारी सुरु केली आहे. तसेच या मोर्चाचा टीझरही पक्षानं रिलीज केला आहे. 


मोर्चाची घोषणा करताना काय म्हणालेले उद्धव ठाकरे? 


मुंबईकरांचा पैसा उधळला जातोय, वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. मुंबईला मायबाप कोणी राहिला नाही.  या भ्रष्टाचाराविरोधात मुंबई महापालिकेवर 1 जुलैला आम्ही मोर्चा काढू. आदित्य ठाकरे या मोर्च्याचं नेतृत्व करतील."