Maharashtra News: महाराष्ट्रातून गेल्या तीन महिन्यात 16 ते 25 वयोगटातील 3 हजार 594 तरुणी राज्यातून बेपत्ता झाल्या आहेत. राज्य सरकारच्या वेबसाईटवर असलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्याची आकडेवारी चिंताजनक आहे, असं म्हणत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. महिलांच्या तपासासाठी गृह विभागाने स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि शोध मोहिम राबवावी, दर 15 दिवसांनी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्यात यावा, अशी सूचना राज्य महिला आयोगाने गृह विभागाला केली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.


राज्य सरकारने हरवलेल्या मुली आणि महिलांचा शोध घेण्यासाठी शक्य तितकी तत्परता दाखवावी, अशी विनंती रुपाली चाकणकर यांनी केली आहे. पाहिजे तशी तत्परता राज्य सरकारकडून दाखवली जात नसल्याचंही त्या म्हणाल्या. राज्य सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत नाहीत, मात्र या प्रकरणात ज्या तत्परतेने काम व्हायला हवं होतं ते होताना दिसत नाही, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.


मुंबईतून सर्वाधिक मुली आणि महिला बेपत्ता होत असल्याचंही रुपाली चाकणकर म्हणाल्या. 1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान राज्यातील 3 हजार 594 महिला हरवल्या आहेत, यातील काहींचा शोध लागला असला तरी एकंदरीतच ही गंभीर बाब असल्याचं मत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे. नोकरी, लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून मुलींची दिशाभूल करुन त्यांचं लैंगिक शोषण केलं जात असल्याचंही समोर आलं आहे. राजकारण सोडून राज्य सरकारने आधी मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणाकडे लक्ष द्यावं, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. मुली बेपत्ता होण्याचा आकडा प्रचंड वाढत असल्याचं त्या म्हणाल्या.


बेपत्ता तरुणींची जिल्हानिहाय आकडेवारी


अहमदनगर 184, अकोला 41, अमरावती शहर 31, अमरावती ग्रामीण 63, औरंगाबाद शहर 66, औरंगाबाद ग्रामीण 52, बीड 27, भंडार 23, मुंबई शहर 383, बुलढाणा 76, चंद्रपूर 101, धुळे 45, गडचिरोली 13, गोंदिया 46, हिंगोली 14, जळगाव 121, जालना 36, कोल्हापूर 127, लातूर 42, मीरा-भाईंदर 113, नागपूर शहर 108, नागपूर ग्रामीण 169, नांदेड 36, नंदुरबार 37, नाशिक शहर 93, नाशिक ग्रामीण 169, नवी मुंबई 75, उस्मानाबाद 34, पालघर 28, परभणी 27, पिंपरी चिंचवड 143, पुणे शहर 148 आणि पुणे ग्रामीण 156 अशी बेपत्ता तरुणींची संख्या आहे. या सर्व बेपत्ता तरुणी 16 ते 25 वयोगटातील आहेत.


हेही वाचा:


Gautami Patil: बार्शीच्या कार्यक्रमाला आपण वेळेतच पोहोचलो होतो; आयोजकांनी केलेला आरोप गौतमी पाटीलने फेटाळला