सोलापूर: बार्शीतल्या कार्यक्रमात मी वेळेतच पोहोचले होते, पण कार्यक्रम उशीरा सुरू झाला, याबाबत त्या आयोजकांची नेमकी काय तक्रार आहे याची माहिती घेईन अशी प्रतिक्रिया गौतमी पाटील हिने दिली आहे. बार्शीतल्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावरुन आयोजकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर आपल्याला गौतमी पाटील हिने फसवल्याची तक्रार त्या आयोजकाने केली आहे.
गौतमी पाटील हिने तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन केलंय. ती म्हणाली की, मला पोलिसांच्या सांगण्यानुसार दहा वाजता कार्यक्रम बंद करावाच लागतो, मी तिथून पुढे काही करू शकतच नाही. पण शो किती वाजता सुरू होतो हेही महत्वाचे आहे. कारण शो किती वाजता सुरू करायचा हे आपल्यावर अवलंबून नसते.
आयोजकांकडून जे काही आरोप करण्यात आले आहेत आणि जी तक्रार दाखल करण्यात आली आहे त्याची सखोल माहिती घेऊन यावर पुढील भाष्य करू असं गौतमी पाटील हिने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर अजून आपलं लग्न ठरलं नाही आणि लग्नाचा अजून कोणताही विचार नसल्याचे देखील गौतमी पाटील हिने स्पष्ट केले आहे.
पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिलेली नसताना गौतमी पाटीलचा सांस्कृतिक लावणी कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र भगवान गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या आयोजकाचे नाव आहे.
आयोजकावर गुन्हा दाखल
बार्शीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयोजक गायकवाड यांनी पोलिसांकडे 12 मे रोजी परवानगी मागितली होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्था, संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याचे गायकवाड यांना लेखी कळवले होते. मात्र कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता त्यांनी थेट कार्यक्रम आयोजित केला.
नियमांचा भंग केल्याने राजेंद्र गायकवाड यांच्या विरोधात बार्शी (Barshi) शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 188, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135, 37(3) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पण दहा वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम सुरू झाला आणि 10 वाजल्यानंतर पोलिसांनी तो कार्यक्रम बंद पाडला. त्यामुळे गौतमी पाटीलची अदाकारी बघायला आलेल्या बार्शीकरांचा हिरमोड झाला. दुसरीकडे आयोजकावरदेखील गुन्हा दाखल झाला आहे.
Gautami Patil Barshi Performance : गौतमी पाटीलने आपली बदनामी केली...
गौतमी पाटील ही परफॉर्मन्स करण्यासाठी रात्री 9.56 वाजता स्टेजवर आली. एकच गाणं झाल्यानंतर पोलिसांनी वेळ संपली म्हणून कार्यक्रम बंद पाडला. मात्र गौतमी पाटीलला संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आपले नृत्य सादर करायचे होते. गौतमी पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी फसवणूक करून मानसिक त्रास दिल्याचा आयोजक गायकवाड यांनी आरोप केला. गौतमी पाटील आणि तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधात बार्शी पोलिसात आयोजक गायकवाड यांनी तक्रार दाखल केली. नियोजित कार्यक्रमाला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूक केल्याचेही तक्रारदार गायकवाड यांनी आरोप केला आहे.
ही बातमी वाचा :