ठाणे : गुरुवारी ठाणे पालिकेच्या ग्लोबल कोविड रुग्णालयात दीड लाखाची रक्कम घेऊन एका रुग्णाला अॅडमिट करून घेण्याचा प्रकार मनसेने उघडकीस आणल्याने पालिका आरोग्य विभाग बदनाम झाल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे महापौर नरेश म्हस्के यांनी मात्र प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या कोरोनाचा कहर वाढला असून अशा परिस्थितीत रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे. सर्व ठिकाणी अशीच परिस्थिती असून त्यामुळं रुग्णही हैराण झाले आहेत. ठाणे महापालिकेनं करोडो रूपये खर्च करून कोविड रूग्णालयं उभी केली असून या रूग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार केले जातात. मात्र असं असतानाही पैसे घेऊन रूग्णालयात प्रवेश दिल्यामुळे रूग्णालय प्रशासनही अडचणीत आलं आहे.


काल रात्री बारा- साडेबाराच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांनाही बेड उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्याच वेळी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास वसईतील एका रूग्णास दीड लाख रूपये घेऊन दाखल करण्यात आलं. वसईतील हा रूग्ण अतिशय गंभीर परिस्थितीत होता. त्याला सेव्हन हिल रूग्णालयातून या रूग्णालयात दाखल करून घेण्यात आलं. पहिले पैसे दिल्यानंतरच रूग्णाला दाखल करून घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. या पैशामध्ये सर्वांचा हिस्सा असून पैसे मंत्र्यां-संत्र्यांपर्यंत जातात असं त्यांना सांगण्यात आलं. अतिशय गंभीर असे हे प्रकरण मनसेने उघडकीस आणले. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला असून या सर्व रेकॉर्डींगची एक प्रतही अविनाश जाधव यांनी पोलीस आयुक्तांकडे पाठवली असून चौकशीची मागणी केली आहे.
         
एकीकडे आरोग्याच्या नावाखाली पैसे खाल्ले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या कठीण काळातही पैसे लाटण्याचे काम सध्या सर्वत्र सुरू आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड मिळवण्यासाठी कोणी किती पैसे मागेल याची भीती आता सर्वसामान्य नागरिकांना वाटू लागली आहे. त्यातच महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात दीड लाख रुपये घेऊन बेड मिळत असलेल्या प्रकरणाने यात नेमके कुणाचे चांगभले होणार आहे, हा संशोधनाचा विषय बनला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. 


गंभीर प्रकरणाची प्रशासनाने सखोल चौकशी करावी - महापौर नरेश म्हस्के


ठाणे ग्लोबल कोविड सेंटरमध्ये रुग्णाला दाखल करुन घेणेबाबत पैसे घेतल्याची चर्चा ठाणे शहरात होत आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेची गंभीर दखल महापौर नरेश म्हस्के यांनी घेतली असून या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांकडे याबाबतचे ठोस पुरावे असतील तर त्यांनी ते तातडीने महापालिकेस सादर करावेत असेही आवाहन महापौरांनी केले आहे.