मुंबई  : घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय झाला आहे. राज्यभरासह मुंबईत देखील मंदिरं उघडण्यात आली. आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वानी पार पाडली पाहिजे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.


Temple Reopen LIVE UPDATES: धार्मिक स्थळं भाविकांसाठी खुली, पाहा प्रत्येक ठिकाणचे लाईव्ह अपडेट्स


सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त व पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था केली तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे असे केले तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड व तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल कौतूक केले. 


Temple Reopen : आजपासून धार्मिक स्थळं भाविकांसाठी खुली, मात्र कोरोनाचे नियम पाळावे लागणार


लवकरात लवकर कोरोना जावो- अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोनाचे संकट गेले दीड वर्षे आहे. आम्हाला नाईलाजास्तव मंदिरं बंद ठेवावी लागली होती. कारण जिथं श्रध्दा असते तिथं भाविक मोठ्या संख्येने जात असतात. पहिली लाट आली दुसरी लाट त्यानंतर सर्वांचं म्हणणं होतं की आता मंदिरं खुली करायला हवीत. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आजपासून सर्व मंदिरं उघडण्यात अली आहेत. गर्दी होऊ नये यासाठी आम्ही लवकर आलो होतो. आमचा त्यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही लवकर आलो. आशिर्वाद मागितले आहेत की लवकरात लवकर कोरोना जावो. आता खूप महत्त्वाचे सण येत आहेत अशा काळात कोरोनाशी संबंधित नियम पाळावेत अशी सर्वांना विनंती आहे, असं पवार म्हणाले. 


पवार म्हणाले की, कालच्या निवडणुकीच्या निकालात आम्ही सर्वत्र एकत्र लढलो नसलो तरी आम्हांला चांगलं यश मिळालं. आमची तिघांची मत एकत्र केली तर तो आकडा मोठा होतो आहे. आम्ही स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला होता. जनतेने देखील आम्हाला समाधानकारक निकाल दिला आहे, असं ते म्हणाले. 


 सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी घेतले परळीत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन
 राज्यातील मंदिरे व सर्व प्रार्थनास्थळे आजपासून दर्शनासाठी खुली करण्यात आली असून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटे 5 वाजता 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या वेळी उपस्थित राहून प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.  सरकारने योग्य वेळी मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला असून, याबद्दल  मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत. भाविकांनी सामाजिक अंतर राखत, मास्कचा वापर करावा तसेच कोविड विषयक नियमावलीचे पालन करून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले आहे.  यावेळी डोंगर तुकाई व काळरात्री देवीच्या दर्शनासाठी भाविकांना ये-जा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत बस सेवेचा  मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.