Maharashtra School Reopen : राज्यात शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रामीण भागात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहायला मिळाला. ग्रामीण भागात पहिल्याच दिवशी 11 लाख विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती लावली असल्याची माहिती शिक्षण विभागानं आहे. कोविडच्या सर्व नियमांचं पालन करत काल विद्यार्थी शाळांमध्ये पोहोचले. दुसरीकडे शहरी भागात अनेक ठिकाणी शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळं  फक्त 20 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 


राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबरपासून अनेक ठिकाणी सुरू झाल्या आहेत. मात्र, पहिल्याच दिवशी शहरी भागातील अनेक ठिकाणी शाळा उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने अल्प प्रतिसाद पाहायला मिळाला. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पहिली ते चौथीच्या वर्गात उत्साहाने उपस्थिती लावली. 


पहिली ते सातवीच्या शाळा सुरू झाल्यानंतर राज्यात पहिल्या दिवशी पहिली ते सातवीच्या वर्गाची एकूण संख्येपैकी 20.71 टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थित दर्शवली आहे. राज्यातील शाळांध्ये पहिली ते सातवीच्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ही 21,99,083 इतकी आहे त्यातील फक्त 4,55,443 विद्यार्थी उपस्थित होते.


तर ग्रामीण भागातील  शाळांमध्ये पहिली ते चौथीच्या वर्गात पहिल्या दिवशी 48.40% विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित दर्शवत उत्साह दाखवला आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गामध्ये 22,51,492 इतकी आहे त्यापैकी 11, 09,012 विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित लावली. 


राज्यात सुरू होणाऱ्या एकूण ग्रामीण भागातील  इयत्ता पहिली ते चौथीच्या 33,557 शाळा आहेत. त्यातील 27,690 शाळा म्हणजेच एकूण संख्येच्या 82.52 % शाळा सुरू झाल्या आहेत. तर शहरी भागात पहिली ते सातवीच्या एकूण शाळांची संख्या ही 8,289 इतकी आहे त्यातील 4,124 शाळा या सुरू झाल्या आहेत.


त्यामुळे मुंबई ,पुणे ,नाशिक, औरंगाबाद ,ठाणे या ठिकाणी जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गाची उपस्थिती सुद्धा वाढेल का हे पाहायला मिळेल.