मुंबई : देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात असली तरी त्याला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्येही राज्य प्रथम क्रमांकावर आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्यामध्येही महाराष्ट्र पहिला आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत 1 कोटी 67 लाख 81 हजार 719 डोस देण्यात आले आहेत.


दरम्यान, काल 5 मे रोजी महाराष्ट्रात 1586 लसीकरण केंद्रांद्वारे एकूण 2 लाख 59 हजार 685 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 53 हजार 967 नागरिकांचा समावेश आहे.


राज्यामध्ये आतापर्यंत 1 कोटी 39 लाख 15 हजार 88 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र पहिला असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.


महाराष्ट्राने लसीकरणात सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर लस वाया जाण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण केवळ 1 टक्के आहे. लसीचा योग्य वापर करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी वेळोवेळी अभिनंदनही केले आहे.


महाराष्ट्र पाठोपाठ राजस्थान (1 कोटी 35 लाख 97 हजार), गुजरात (1 कोटी 32 लाख 31 हजार), पश्चिम बंगाल (1 कोटी 14 लाख 75 हजार), कर्नाटक (1 कोटी 1 लाख 11 हजार) इतके लसीकरण झाले आहे.


राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीनं भरती होणार


राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. 


संपूर्ण राज्यात कोरोनाचे संकट आहे, रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात ही भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. साधारणपणे भरतीच्या प्रक्रियेचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये होत असतो. पण यावेळी भरतीचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून हे भरतीचे लवकरच आदेश निघतील अशी माहिती आहे.