Mumbai Rain : सकळापासूनच मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस (Rain) सुरु आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी सखोल भागात पाणी साचलं आहे. याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार मुंबईत (Mumbai) आज पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. आज मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल मुंबईत यलो अलर्ट देण्यात आला होता. दरम्यान, गेल्या 24 तासात मुंबईच्या शहरी भागात 53.93 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पूर्व उपनगरात 27.97 मिमी आणि पश्चिम उपनगरात 45.69 मिमी पावसाची नोंद झाली असल्याचे माहिती हवामान विभागानं दिली आहे.
समुद्रात 4.50 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा येण्याचा इशारा
आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पावसाचा ऑरेंज अलर्ट दिल्यामुळं आज समुद्र खवळण्याची शक्यता आहे. समुद्रात आज 4.50 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा येण्याचा इशारा देखील हवामान विभागानं दिला आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास समुद्रात 4.78 मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट
राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. मात्र, अद्यापही राज्यातील अनेक भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता अन्य ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यातील शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. पावसामुळं शेतीचं काम खोळंबली आहेत. दरम्यान राज्यातील कोकणातील जिल्ह्यांसह मुंबई, ठाणे, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.