Shinde Faction On Guwahati Tour: राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटाचे आमदार (Shinde Faction MLA) आज कुटुंबासह गुवाहाटीमध्ये (Guwahati) दाखल होणार आहेत. गुवाहाटी येथील कामाख्या मातेच्या (Kamakhya Mata Mandir) मंदिरात हे आमदार जाणार असून तिथे पूजा करणार आहेत. विरोधकांकडून या दौऱ्यावर टीका करण्यात येत आहेत. गुवाहाटीमधील कामाख्या मंदिराला कोणाचा बळी देणार, असा उपरोधिक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केल्यानंतर शिंदे गटाने याला प्रत्त्युत्तर दिले आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावर भाष्य करताना आम्ही बळी देणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या विकासविरोधी विचारांचा बळी देणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले. 


मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले की, कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहोत, हे महाराष्ट्राच्या विकासासाठी आशिर्वाद मागण्यासाठी जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोणाचा बळी देणार असा प्रश्न केला होता. महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या विचारांचा बळी घ्यावा असे कामाख्या देवीला साकडं घालणार आहोत, असे दीपक केसरकर यांनी म्हटले. राज्यावरील संकटे दूर करावीत, नैसर्गिक आपत्ती, वादळे, महासाथीच्या आजारासारखे अरिष्ट दूर करावे, या अरिष्टांचा बळी घ्यावा, अशी प्रार्थना करणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले. राज्यातील जनतेला सुखी करावे, राज्याचा विकास व्हावा यासाठी देवीला साकडं घालणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले.  


कोणतीही नाराजी नाही


शिंदे गटाचे मंत्री, आमदार आज गुवाहाटीला जात असले तरी काही मंत्री, आमदार या दौऱ्यापासून दूर आहेत. गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार हे मंत्री गुवाहाटीला जाणार नाहीत. तर, काही आमदारदेखील गुवाहाटी दौऱ्यापासून दूर आहेत. याबाबत बोलताना दीपक केसरकर यांनी म्हटले की, सरकारमध्ये कोणतीही नाराजी नाही. अनेकांचे कार्यक्रम याआधीपासून ठरले होते. त्यामुळे काहीजण अनुपस्थित आहेत.आम्हालादेखील अचानकपणे या दौऱ्याची माहिती मिळाली. त्यामुळे आम्हीदेखील आमचे कार्यक्रम स्थगित करून गुवाहाटीला जात असल्याचे केसरकर यांनी म्हटले.  


शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सुरत मार्गे गुवाहाटी गाठलं होतं. तिथं त्यांच्यासह सर्व आमदारांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. तेव्हा कामाख्या देवीला केलेला नवस फेडण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सगळ्याच आमदारांसह गुवाहाटीला आज जात आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या: