Sanjay Raut : महाराष्ट्रात सध्या संतप्त वातावरण आहे. अशा स्थितीत सरकार आहे कुठं? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या बाबतीत सरकार गप्प. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, सांगली खेचून घेण्याची भाषा केली तरी सरकार गप्प. आता भाजपचे प्रचारक रामदेवबाबांनी महिलांविषयी अपमानकारक वक्तव्य केलं आहे, तरी सरकार गप्प आहे. या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीय का? एवढच मला विचारायचंय असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. आज सकाळी संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
आज सगळ्यांचा समाचार घेतला जाईल
आज आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी बुलढाण्याला जात आहोत. आजची बुलढाण्यातील सभा ही ऐतिहासीक होणार असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. आजच्या सभेत उद्धव ठाकरे हे अनेक विषयावरती आपल्या भूमिका व्यक्त करतील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राचा अपमान केला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल आणि भाजपच्या प्रवक्त्याने केलेलं वक्तव्य असेल, या सगळ्यांचा समाचार आज घेतला जाईल असेही संजय राऊत म्हणाले. त्यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
बुलढाण्याच्या भूमित निष्ठा आणि इमान याचंच बीज
ज्या मातेनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा वीरपुरुष दिला त्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या भूमित आजची जाहीर सभा होत आहे. त्या भूमित निष्ठा आणि इमान याचंच बीज रोवलं गेलं आहे. इथं बेईमानी करणाऱ्याला लोक अजिबात थारा देणार नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले. या पवित्र भूमित आज विराट सभा होत असल्याचे राऊत म्हणाले.
रामदेवबाबा यांच्यावर टीका
रामदेवबाबा यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली. रामदेवबाबा यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत लज्जास्पद आहे. ज्यावेळी त्यांनी वक्तव्य केलं त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील तिथे उपस्थित होत्या. त्या कशा गप्प बसल्या? असा सवाल राऊतांनी केला. असं वक्तव्य करणारा कोणाही, कितीही मोठा असो, त्याच्या सणसणीत कानाखाली बसायला पाहिजे असेही राऊत म्हणाले. एकिकडे तुम्ही महिला सबलीकरणाच्या गोष्टी करता, कायदे बनवता, ज्ञान पाजळता आणि त्याचवेळेला असंख्य महिलांसमोर एक बाबा महिलांचा अपमान करतो, तरीही सरकार गप्प असल्याचे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: