Bhagatsingh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वादग्रस्त राज्यपाल म्हणून जगभरात प्रसिद्ध असून त्यांनी महाराष्ट्राचा अपमान करण्याची पुन्हा हिंमत करू नये असा इशारा शिवसेनेच्या नेत्या, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला. यावेळी त्यांनी राज्यपालांची पाठराखण करणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही टीकास्त्र सोडले.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल म्हणून असलेली जबाबदारी कधीच पार पाडली नाही. राज्यपाल हे केवळ वादग्रस्त राज्यपाल म्हणूनच प्रसिद्ध आहेत. त्यांना कशीही प्रसिद्धी हवी असते. नकारात्मक प्रसिद्धी असली तरी चालते. राज्यपाल पदाचा मान सन्मान आम्ही ठेवतो. या पदाचा मान राखून सांगते की, यापुढे राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान करण्याची हिंमत करू नये, असा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्रातील मराठी माणसांचं योगदान कसं विसरता येईल. महाराष्ट्रात राहुनच मराठी लोकांचा विसर कसा पडतो असा सवालही पेडणेकर यांनी केला.
हा गुन्हा पुन्हा करू
मराठी माणसं जर आपल्या भूमीत सर्वांना सामावून घेतात, त्याचे पोट भरते, हा गुन्हा आहे असं राज्यपालांना वाटत असेल तर हा गुन्हा आम्ही पुन्हा करू असे पेडणेकर यांनी सांगितले. राज्यातील नागरिकांमध्ये फूट पाडू नका असे आवाहनही त्यांनी केले.
नितेश राणेंवर टीकेची झोड
नितेश राणे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची पाठराखण केली. राज्यपालांना विरोध करणाऱ्यांनी किती मराठी माणसांना मोठं, श्रीमंत केलं असा सवाल केला होता. किशोरी पेडणेकर यांनी नितेश राणेंवर पलटवार केला. नितेश राणे लहान असताना त्यांचे वडील नारायण राणे हे बेस्ट समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी कोणाला मोठं केले, याचे उत्तर शोधावे असे पेडणेकर यांनी सांगितले. राणे जिथे जातात, त्या पक्षाची सुपारी वाजवतात असा आरोपही किशोरी पेडणेकर यांनी केला. राणे कुटुंबीय हे सुपारी घेणारे कुटुंब असल्याची बोचरी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.
राज्यपाल कोश्यारी यांनी काय म्हटले?
गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. शुक्रवारी, मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई, ठाणेच्या विकासात गुजराती, मारवाडी समाजाचे मोठं योगदान आहे.