Uddhav Thackeray : शिवसेनेत झालेली अभूतपूर्व बंडाळी आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2022) पार्श्वभूमीवर आज मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात भाषणातून जी किमया उद्धव ठाकरे यांना साधता आली, तीच किमया पुन्हा ते करणार का, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. 


महाराष्ट्र विधानसभेच्या 2014 मधील निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली होती. त्यानंतर निवडणूक निकालानंतर भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. सहा महिन्यानंतर भाजपसोबत शिवसेनादेखील सत्तेत आली होती. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये शिवसेना ही दुय्यम भूमिकेत असल्याचे चित्र होते.


पाच वर्षांपूर्वी काय झाले होते?


राज्य सरकारमध्ये दुय्यम भूमिकेत असलेल्या शिवसेनेसाठी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह इतर महापालिका निवडणुका महत्त्वाच्या होत्या. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती सुरू होती. मात्र, भाजपने 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या आधारे जागा वाटप करण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार, मुंबईत भाजपने 114 जागांची मागणी केली होती. तर, शिवसेनेने 60 जागा देऊ केलेल्या. जागा वाटपाच्या मुद्यावरून दोन्ही पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली होती. मुंबई महापालिका जिंकण्याचा चंगच भाजपने बांधला होता. तर, कोणत्याही परिस्थितीत पुन्हा विजय मिळवायचा असा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला होता. महापालिका निवडणुकीसाठी काही दिवस उरले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युतीबाबत अंतिम निर्णय घेतील असे शिवसेनेने जाहीर केले. त्यानंतर 27 जानेवारी 2017 रोजी गोरेगावमधील नेस्को मैदानात शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. 


उद्धव ठाकरे यांनी काय म्हटले होते ?


शिवसेनेच्या मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भाषण केले. या भाषणात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. 1997, 2003,2007, 2012 मध्ये कोणाचीही हवा नसताना शिवसेनेने केलेल्या कामाच्या जोरावर महापालिका निवडणुकीत यश मिळवले होते. 2012 च्या निवडणुकीत युतीत असलेल्या भाजपला शिवसेनेने आधार दिला होता असेही उद्धव यांनी म्हटले होते. 


शिवसैनिक मुंबईकरांसाठी मेहनत घेतो, राबतो आणि विजय मिळवतो असेही उद्धव यांनी म्हटले होते. भाजपला कोणत्या आधारावर अधिक जागा द्यायच्या असा सवाल उद्धव यांनी केला होता. आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर जागा मागतोय, थापा मारून जागा मागत नसल्याचे टोला त्यांनी भाजपला लगावला होता. 


युतीत 25 वर्ष सडली


उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षांपूर्वींच्या नेस्कोमध्ये केलेल्या भाषणात भाजपवर सडकून टीका केली होती. देशाचे पंतप्रधानही हवे, राज्याचे मुख्यमंत्रीपदही हवे, चांगली खातीदेखील हवीत आणि आता माझ्या घरात घुसून आमच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची पंचारती ओवाळू का असा सवाल उद्धव यांनी केला होता. शिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली असल्याचे मोठं वक्तव्यही उद्धव ठाकरे यांनी केले होते. देशासाठी, हिंदुत्वासाठी आम्ही तुमचा उदोउदो केला. मुंबईत अमराठी बहुल भागात तुम्हाला मदत केली. हिंदू मतांमध्ये फूट पडू नये अशी आमची भूमिका आहे, असेही उद्धव यांनी या भाषणात म्हटले होते. कोणासमोर झुकणार नाही, युतीसाठी कटोरा घेऊन जाणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. उद्धव यांच्या या आक्रमक भाषणाने मुंबईतील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे चित्र होते. 


आता परिस्थिती आणखी गंभीर


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षांपूर्वीच्या भाषणात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करताना निखाऱ्यावर चालणारे सैनिक हवे, अस्तनीतील शिवसैनिक नको असे म्हटले होते. पाठीवर वार करणारे, बंडखोरी करणारे नको असे म्हटले होते. आता पाच वर्षानंतर पुलाखाली बरेच पाणी वाहून गेले आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात झाला. त्यातून उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्रीदेखील झाले. मविआच्या अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेत मोठी फूट पडली. राज्यात आता शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा उभा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. 


उद्धव यांच्या भाषणाने चित्र बदलणार?


मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी संयमी भाषणे केली होती. आता त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षप्रमुखांच्या भूमिकेतून उद्धव ठाकरे हे आक्रमक भाषण करणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर न्यायालयीन लढाई सुरू आहे. तर, दुसऱ्या बाजूला रस्त्यावरील संघर्ष टाळण्याची सूचना शिवसेना नेतृत्वाने केली आहे. आज, मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा होणार आहे. शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत गटप्रमुख हा महत्त्वाचा घटक आहे. गटप्रमुखांकडे किमान 20 शिवसैनिकांची जबाबदारी असते. त्यामुळे गटप्रमुख अधिक सक्रिय राहिल्यास शिवसैनिकही तेवढाच सक्रिय राहणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी पाच वर्षांपूर्वी भाषणातून शिवसैनिकांमध्ये आणलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून देणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.