Shivsena Uddhav Thackeray : काही महिन्यांवर आलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या आणि शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांचा आज मेळावा पार पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना (Shivsena) मुंबई महापालिका निवडणुकीचे (BMC Election) शिवसेना रणशिंग फुंकणार आहे. दसरा मेळाव्याआधी होणाऱ्या मेळाव्याला विशेष महत्त्व आले आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात आज संध्याकाळी 7 वाजता हा मेळावा होणार आहे. 


मुंबई महापालिकेवर मागील 30 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. त्यापैकी 25 वर्ष शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. मागील महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्य लढत झाली होती. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये फार कमी अंतर राहिले होते. त्यामुळे शिवसेनेला सत्तेतून बाहेर करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडाने शिवसेना काही प्रमाणात कमकुवत झाल्याचे चित्र आहे.


शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच शिवसैनिकांना जाहीर मार्गदर्शन करणार आहेत.  शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये मुंबईसह इतर ठिकाणी राडे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


उद्धव ठाकरे 'या' मुद्यावर भाष्य करणार?


आतापर्यंत शिवसेनेचं राजकारण हे बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व आणि मराठी माणूस यांच्या भोवती फिरत आलेलं आहे. बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना भाजपनं फोडल्याचा वारंवार आरोप होत आहे. अगोदर  पक्ष फोडला, मग चिन्हासाठी धडपड आणि आता दसरा मेळाव्यासाठी असलेल्या शिवतीर्थासाठी भांडण या मुद्दयांवरून उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकांना भावनिक साद घालू शकतात.  


गणेशोत्सवाच्या निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी भाजप नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत शाहांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे हे अमित शाह यांच्या भाषणाचा समाचार घेऊ शकतात. मागील काही महिन्यांत शिंदे गटाच्या आमदारांनी मातोश्रीविरोधात केलेल्या व्यक्तव्यांचा समाचार उद्धव ठाकरे घेण्याची शक्यता आहे. 


केंद्रीय यंत्रणांचा राज्यात होत असलेला वापर, मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारावरून मातोश्रीवर होत असलेल्या आरोपांवरून मागील काही दिवसांत मोठं राजकारण घडलं होतं यावर देखील विरोधकांना ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.